Breaking News

मोदी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले ; राहुल गांधींची टीका

लखनौ, दि. 28 - आज देशात गरीब व कमजोर लोकांसाठी कुठेही जागा नाही. केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशातच दलितांवर अन्याय, अत्याचार केले जात आहेत. याला भाजपप्रणित केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केली. सहारनपूरमधील पीडित कुटुंबियांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
सहारनपूर भागात दलित व ठाकूर समाजात झालेल्या वादानंतर झालेल्या दंगलीत दलित समाजातील 50 जणांची घरे जाळण्यात आली. जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असतानाही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सहारनपूरमधील दलित कुटुंबांना भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. प्रशासनाने गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पायी चालत सहारनपूरमध्ये पोचले. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर उपस्थित होते.
काश्मीरमधील अशांततेबाबतही गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. जेव्हा काश्मीर शांत असते तेव्हा देश आनंदी असतो आणि जेव्हा काश्मीर अशांत असते तेव्हा पाकिस्तान खूश असतो. सरकार उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. देशात जो शक्तीशाली नाही ते सर्व भयभीत आहेत. अशा प्रकारे देश चालवण्याची पद्धत नाही, असेही गांधी म्हणाले.