Breaking News

पर्यावरणप्रेमींनी अनुभविली कलात्मक बोन्सायची अनोखी दुनिया

पुणे, दि. 28 - एरवी रस्त्यावर मोठमोठ्या आकारात दिसणारा वड, चिंच, आंबा, बोधी, पिंपर्णी यांसारख्या वृक्षांचे छोट्या आकारातील रुप... नुकत्याच लावलेल्या  नवीन बोन्साय पासून तब्बल 150 वर्षाच्या वडाचे बोन्साय...छोट्या छोट्या झाडांना लागलेल्या मोठ्या कैजया, पेरु, चेरी पाहून पुणेकर चकित झाले. बोधी, पिंपर्णी,  बोगनवेल, फायकस, चिंच, आंबा, लाल चंदन, करवंद, चिकू यांसारखी देशी,तर ब्राझीलियन रेन ट्री, बुसिडा, जॉमेट्री, प्रेमना, इंडोनेशियन कॅज्युरीना यांसारख्या  विदेशी झाडांची बोन्साय रुपातील कलात्मक झाडे पाहण्यासोबतच बोन्सायची अनोखी दुनिया पुणेकरांनी अनुभविली. 
निमित्त होते, फ्रेंडस् ऑफ बोन्साय, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवीवर्षानिमित्त टिळक स्मारक मंदिर कलादालनात आयोजित बोन्साय प्रदर्शनाचे. या प्रदर्शनाचे उद्घाटन  इंडोनेशियाचे बोन्सायतज्ञ रुडी नायॉन यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या वैजयंती महाजन, रुक्मिणी साठे, प्राजक्ता काळे, रेखा कानिटकर उपस्थित होत्या.
वैजयंती महाजन म्हणाल्या, एकूण 170 बोन्साय झाडे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यामध्ये देशी आणि विदेशी झाडांचा देखील समावेश आहे. आंतरराष्ट्रीय  तज्ञांच्या मदतीने आम्ही बोन्सायची नवीन शैली देखील सादर केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बोन्साय हा अतिशय चांगला पर्याय  आहे. त्यामुळे बोन्सायचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन बोन्सायचे वृक्ष लावावेत, असे त्यांनी सांगितले.
रुक्मिणी साठे म्हणाल्या, हल्ली शहरात झाडे लावण्यासाठी जागेची कमतरता असते. बोन्सायची झाडे सुंदर दिसतात. त्यांना जागा कमी लागते, त्यामुळे बोन्सायची  मागणी सध्या वाढत आहे. कमी जागेत देखील मोठ्या झाडांप्रमाणे सर्व फायदे बोन्साय मधून मिळतात, यासाठी बोन्सायचे प्रमाण वाढत आहे.