Breaking News

बोरगाव पोलिसांची कारवाई; दारुसह पावणेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नागठाणे, दि. 11 (प्रतिनिधी) - अवैधरीत्या चोरटी दारू वाहतूक करणारा अमर शरद भिसे (वय 27, रा. मल्हारपेठ, ता. पाटण) या युवकास बोरगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 30 बॉक्स देशी दारू व टाटा सफारी असा सुमारे 4.75 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पंधरा दिवसात अवैध दारू वाहतुक करणार्‍यांच्या विरोधात पोलिसांनी केलेली दुसरी कारवाई आहे. 
पाली मार्गे उंब्रजकडे टाटा सफारी (एमएच 11-एडब्लू 2233) या गाडीतून देशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती सपोनि मयूर वैरागकर यांना मिळाली. यावेळी सपोनि वैरागकर, हवालदार किरण निकम व दीपककुमार मांडवे यांनी काशीळ येथे उंब्रजकडे जाणार्‍या महामार्गानजीकच्या सेवा रस्त्यावर सापळा रचला होता. सकाळी 10.45 च्या सुमारास संशयित सफारी गाडी पाली मार्गे सेवा रस्त्यावरून उंब्रजकडे जात असल्याची पोलिसांच्या निदर्शनास आली.  
पोलिसांनी चालकास गाडी बाजूला घेण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांनी चालक अमर शिवाजी भिसे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता देशी दारूचे बॉक्स आढळले. पोलिसांनी चालक व टाटा सफारी गाडी पोलीस ठाण्यात आणली. गाडीतून 75 हजार रुपये किमतीचे देशी दारूचे 30 बॉक्स व सुमारे 4 लाख रुपये किमतीची टाटा सफारी गाडी असा 4.75 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पंधरा दिवसात बोरगाव पोलिसांनी चोरट्या दारू वाहतुकीचा भांडाफोड केला आहे. यापूर्वी वेणेगाव येथे सापळा रचून सुमारे 4.70 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि मयूर वैरागकर अधिक तपास करत आहेत.