Breaking News

नैसर्गिक आपत्तींपासून बचावासाठी सजग रहावे : जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 30 - आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्ह्यात पुर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कुठलीही जिवीतहानी किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी बचावासाठी सज्ज रहावे, अशा सूचना  जिल्हाधिकारी डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सुनपूर्व तयारींचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पुर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भल्यास त्यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या बचावासाठी महसूल विभागाने तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज रहावे. बचावाच्या अनुषंगाने लाईफ बोट, लाईफ मन, दोर तसेच आवश्यक बाबींची तपासणी करुन मुख्यालयी साधनसामुग्री तयार ठेवावी. संचार व्यवस्था, स्थालांतर, शोध व बचाव, वैद्यकीय प्रतिसाद व ट्रामा केअर यासारख्या सुविधा तातडीने उपलब्ध होईल याचे अगोदरच नियोजन करावे. अतिवृष्टी झालीच तर महसूल विभागाने त्या भागात जावून तातडीने पंचनामे करुन कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाने प्रकल्पात किती जलसाठा आहे याची तपासणी करावी तसेच अतिवृष्टी झाल्यास प्रकल्पांमध्ये अधिक किती जलसाठा सामावून राहील याची 24 तास निगराणी तपासणी करावी. त्यासाठी विशेष चमू नियुक्ती करावी. महसूल विभागाने पुरामुळे बाधीत होणात्या गावांची भौगोलिक स्थिती जाणून तश्या प्रकारची बचावात्मक कार्यवाही ग्राम पंचायत व तालुका स्तरावर  प्रथमच करुन ठेवावी. पुर बाधित जीवनावश्यक वस्तूंचे साठवणूक, आरोग्य सुविधा, तात्पुरत्या निवासाची सोय आदी बाबींचे नियोजन करावे. गाव तलाव, पाझर तलाव तसेच एखादया प्रकल्पातून परत येणार्‍या (बॅक वॉटर ) मुळे प्रभावीत होणार्‍या गावांची यादी तयार करावी. त्या ठिकाणी बचावात्मक सुविधांचे नियोजन करुन सज्ज ठेवाव्यात.