Breaking News

वनीकरणासाठी महसूल कर्मचार्‍यांनी खरशिंदे गाव घेतले दत्तक

संगमनेर, दि. 30 - ग्लोबल वार्मिगच्या समस्येवर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी बनली आहे. पर्यावरण रक्षणासाठी संगमनेर तालुक्याच्या महसूल विभागाच्या सेवकांनी श्रमदान व वनीकरणासाठी खरशिंदे या गावाची निवड करुन सामाजिक बांधिलकी जपत राज्यातील इतर विभागांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. 
दंडकारण्य अभियानातून प्रेरणा घेत खरशिंदे येथे महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी वृक्षारोपनासाठी श्रमदानातून सुमारे 1300 खड्डे खोदले. यावेळी उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, शिरस्तेदार सुरेश भालेराव, नायब तहसिलदार दत्ता जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, लागवड अधिकारी हर्षल पारेकर, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, समन्वयक बाळासाहेब उंबरकर, सरपंच सौ. मिनाताई भोर आदींसह ग्रामस्थ, मंडळअधिकारी, तलाठी, कोतवाल व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.  
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी बनली आहे. जागतिकीरणाच्या नावाखाली वाढलेले प्रदुषण, वृक्षतोड यामुळे ग्लोबल वॉर्मिगचा धोका वाढला आहे. तो कमी करण्यासाठी वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. यासाठी थोर स्वातंत्र सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सुरु केलेले दंडकारण्य आमदार बाळासाहेब थोरात व दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेले दंडकारण्य अभियान हे पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ बनली आहे. प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी या अभियानात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग घ्यावा असे अवाहन केले होते. यातून प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकी जोपासत  संगमनेर महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी श्रमदान व वृक्षरोपनासाठी संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गाव दत्तक घेवून उंबरेश्‍वर डोंगरावर वृक्षारोपनासाठी सुमारे 1300 ख्ड्डे खोदले.
यावेळी प्रांताधिकारी डोईफोडे म्हणाले, निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे मुलभुत कर्तव्य आहे. प्राणवायु देणारे वृक्षरोपन करणे, त्यांचे संवर्धन करणे यासाठी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्वयंस्फृर्तीने हे काम हाती घेतले आहे. यावर्षी या ठिकाणी अधिकाधिक वृक्षारोपन करुन त्याचे संवर्धन करणार आहोत असे ही ते म्हणाले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सर्व कर्मचार्‍यांना वनभोजन देण्यात आले.