Breaking News

भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचं आज भिलार येथे उद्घाटन

मुंबई, दि. 4 : सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द असलेले भिलार हे गाव देशातले पहिले पुस्तकाचे गाव म्हणून साकारत असून या पुस्तकाच्या गावाचं उद्या, 4 मे रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, महाबळेश्‍वर पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपाली राजपुरे, भिलारच्या सरपंच सौ. वंदना भिलारे यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द असलेले भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून रुपांतरित होत आहे. सुमारे  हजारांहून अधिक पुस्तकांचा खजिना या पुस्तकाच्या गावात उपलब्ध असून त्यात कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, स्त्री साहित्य, संतसाहित्य, चरित्र आदी विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात साकारत असेल्या भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन येत्या 4  मे, रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पाचगणी ते महाबळेश्‍वर रस्त्यावर भिलार गावातील श्री जननी माता मंदिर परिसरात उद्घाटन समारंभ होणार आहे.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ही भावना मनात ठेवून भिलार गाव पर्यटकांचे आणि रसिक-वाचकांचे स्वागत करायला सज्ज झाले आहे. प्रत्येक ठिकाणी सुमारे 400 ते 500 अशी एकूण सुमारे 15000 पुस्तके वाचकांसाठी गावात उपलब्ध आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी कपाट, टेबल, टी-पॉय, खुर्च्या, सुशोभित छत्री, बिन बॅग इत्यादी वस्तू पुरवण्यात आल्या आहेत. पर्यटक किंवा रसिक-वाचक घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकल्पात सहभागी असलेल्या ठिकाणांचे (घरे व सार्वजनिक जागा) सुसज्ज व सुंदर ग्रंथालयांत रुपांतर करण्यात आले आहे. पर्यायाने, संपूर्ण भिलार गावच एक ग्रंथालय बनले आहे. भिलारवासियांनी राज्य शासनाच्या पुढाकाराला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने निसर्गरम्य असलेल्या गावात स्वत्व या स्वयंसेवी गटाच्या सुमारे 75 चित्रकारांनी गावातील 25 ठिकाणे आपल्या कलेच्या माध्यमातून सजवली आहेत.