Breaking News

गुंफन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे

मसूर, दि. 11 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील मसूर येथे दि. 21 मे रोजी होत असलेल्या 14 व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, व्यासंगी पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्‍वर चेणगे यांनी दिली. 
गुंफण अकादमीमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून मसूर येथे संमेलनाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे यांची निवड करण्याचा निर्णय अकादमीच्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
व्यासंगी पत्रकार, सृजनशिल लेखक, महाराष्ट्रातील एक प्रभावी वक्ता म्हणून उत्तम कांबळे यांना सर्वजण ओळखतात. आई शेतमजूर, कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती असलेल्या कांबळे यांनी विक्रेता, हमाली, बांधकाम मजूर, ओरडून पेपर विकणे आदी सर्व कामे करत शिक्षण घेऊन, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली. पाच कादंबर्‍या, पाच कथा संग्रह, सहा ललित लेख संग्रह, आठ संशोधनपर ग्रंथ, पाच कविता संग्रह, सहा संपादित पुस्तके असे त्यांचे विपूल लेखन प्रसिध्द झाले आहे. वाट तुडवताना, आई समजून घेताना ही त्यांची आत्मकथनात्मक पुस्तके प्रचंड वाचकप्रिय ठरली आहेत. त्यांचा पत्रकारितेसाठी 32 तर साहित्यासाठी 37 पुरस्कारांनी गौरव झाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत. अनेक संमेलनांचे उद्घाटक असा मानही त्यांना मिळाला आहे. पत्रकारिता करताना देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसमवेत परदेश दौर्‍यावर जाण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. गुंफण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या चतुरत्र व्यक्तीमत्वाचे विचार ऐकण्याची संधी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील लोक, साहित्य रसिकांना मिळत आहे, असेही डॉ. चेणगे यांनी सांगितले.