Breaking News

महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांनी वैचारिकदृष्ट्या एक होणे गरजेचे - प्रा. डॉ. मिलिंद कसबे

पुणे, दि. 24 - आज महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांनी वैचारिकदृष्ट्या एक होणे गरजेचे आहे. या सांस्कृतिक सामाजिक एकीतूनच उद्याचा प्रागतिक आंबेडकरवाद उभा  राहील. जागतिकीकरण, सांस्कृतिक वर्चस्ववाद, देशीवाद, राष्ट्रवाद आणि कर्मठ आंबेडकरी आचरण ही आजच्या आंबेडकरवादापुढील आव्हाने आहेत, असे प्रतिपादन  प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी केले. 
लोकजागर व्याख्यानमालेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नव्या समाजाची चाहूल नियतकालिक यांच्या विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत डॉ. कसबे ते बोलत  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. किशोर मांदळे होते. याप्रसंगी व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. सुरेश बेरी, संजय बनसोडे, सचिन देसाई, कॉ. गणेश दराडे,  देविदास इंगळे, ज्ञानेश्‍व र विटकर, मिलिंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कसबे म्हणाले, भारतीय समाज एका सांस्कृतिक दहशतवादाच्या असहिष्णू वातावरणात उभा असताना प्रागतिक आंबेडकरवाद उभा करण्याची गरज आहे. डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ जातीच्या चौकटीत बसवून किंवा त्यांच्या नावाचा जयघोष करून पारंपरिक चळवळीची शकले उडाली आहेत. याचा परिणाम म्हणजे,  आजही दलितांचे स्वतंत्र असे व्यापक सांस्कृतिक राजकारण उभे राहू शकले नाही. विघटनाचा शाप माथी मारलेल्या दलित नेत्यांनी प्रतिगामी शक्तींशी हात न मिळवता  जातीविरहित धर्मनिरपेक्ष राजकारण उभे करणे आजची गरज आहे. तसे झाले नाही तर, बुद्धांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची सम्यक समतेची परंपरा  धर्मांधशक्तींना काबीज करणे सोपे होईल. मार्क्समवादी, समाजवादी, कम्यूनिस्ट आणि दलित चळवळीने एकमेकांना समजून घेऊन एकीने पुढे गेले, तरच गौतम बुद्धांना  अपेक्षित असणारा सभ्य व विचारी समाज उभा राहील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. चार दिवसांच्या या व्याख्यानमालेत कायदेतज्ज्ञ अँड. असीम सरोदे, डॉ. हमीद  दाभोलकर, लेखक डॉ. सरेश बेरी यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.