Breaking News

देशी राजकारण्यांचा सोस सामाजिक सलोख्याचा बळी घेतोय...!

दि. 08, मे - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु  संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...
सन 2015-16 हे वर्ष सामाजिक सलोख्याच्या  दृष्टीने धोक्याचे ठरले.अगदी सोळावं वरीस  धोक्याचं म्हणतात तसं.वर्षभरात निघालेले क्रांती मोर्चे  या परिस्थितीला जबाबदार आहेत असं निरिक्षण नोंदवलं जात आहे.हे निरिक्षण अगदीच अवास्तव नसलं तरी ही परिस्थिती एका दिवसात किंवा एका वर्षात निर्माण झाली नाही.दिडशे वर्ष परकीय सत्तेने विषमतेची बीजं पेरून भोगलेली सत्ता आणि त्याच पाऊलांवर पाऊल ठेवून देशी सत्ताधार्यांनी केलेले राजकारण हेच विद्यमान सामाजिक परिस्थितीला जबाबदार असल्याचं मत सामाजिक चळवळीत हयात घातलेले प्राचार्य म.ना.कांबळे व्यक्त करतात.
महाराष्ट्राच्या मातीत वाढलेली पुरोगामी चळवळ देशाचा सामाजिक सलोखा प्रगल्भ करण्याची क्षमता राखून असतांना याच मातीतील बहुजन एकमेकांचे कट्टर शञु म्हणून आज समोरासमोर उभे ठाकले आहे.जातीचा मिथ्या अभिमान गर्वात परावर्तीत होऊन जातीसाठी स्नेहभावाचे नाते रक्ताच्या रांगोळीने रंगविण्याची मानसिकता वाढीस लागली आहे.विशेषतः गेल्या वर्ष दोन वर्षात अधिक गांभिर्याने जातीय अस्मिता समाजाच्या पदराआडून डोकावताना दिसते आहे.
गावगाडा हाकणारा अठरा पगड बारा बलुतेदार बहुजन समाज एकमेकांकडे संशयाने पाहू लागला आहे,विशेषता बहुजन समाजातील दोन मोठे घटक समाज मराठा आणि दलीत हे एकमेकांचे भाऊ म्हणविणारे भाऊबंधकीच्या लढाईचे शस्र परजू लागले आहेत.सख्खे भाऊ पक्के वैरी यापेक्षाही भयानक परिस्थिती या दोन समाजात निर्माण झालेली दिसते.
शेकडो वर्षाची परंपरा अलिकडच्या काही वर्षात रसातळाला जाण्याची मिमांसा समाज तज्ञांसमोर एक आव्हान ठरली आहे. खरे तर या परंपरेला तडा जाण्यास अलिकडाची पाच पंचवीस वर्ष कारणीभुत नाहीत तर शेकडो वर्षापासून या प्रक्रियेची बीजं रोवली गेली आहेत.ब्रिटीश राजसत्तेने भारतीय उपखंडावर आपली निर्विवाद सत्ता प्रस्थापित करण्यासाठी खेळलेली खेळी देशी राजकारण्यांनी जशीच्या तशी राबविल्याने सामाजिक सलोख्याचा बळी गेला असे अभ्यासकांचे मत आहे. ब्रिटीशांना फक्त भारतीयांचे शोषण करून आर्थिक आणि राजकीय वर्चस्व निर्माण करायचे होते.सामाजिक सलोख्याशी त्यांना कुठलेच सोयरसुतक नव्हतं. उलट भारतीय समाज जेव्हढा दुभंगलेला राहील तेव्हढा त्यांना सत्ता राबविण्याच्या दृष्टीने फायदा होता.फोडा,झोडा आणि राज्य करा ही निती त्या सत्ता प्रक्रियेचे अविभाज्य अंग होते.त्यासाठी त्यांनी भारतातील एका विशिष्ट समाजाला हाताशी धरून जातीय व्यवस्था आणखी बळकट केली.आणि आपला हेतू साध्य केला. जाता जाता भारतीयांच्या हातात सत्ता सोपवितांना हीच देण ते देऊन गेले.भारतीयांच्या दुर्दैवाने आमच्या राज्यकर्त्यांनाही सत्तेचा सोस भागविण्यासाठी इंग्रजांची ही निती जवळची वाटली,त्यांनीही तोच प्रयोग सुरू ठेवला.त्याचेच भोग समाज आज भोगतो आहे.उलट गेल्या सत्तरषवर्षात ही प्रवृत्ती राजकारण्यांमध्ये बळावली .विदेशींपेक्षाही सत्तेचा सोस देशी राजकारण्यांमध्ये अधिक दिसतो आहे.सत्ता भोगण्यासाठी समाजाचा बळी देण्याची प्रवृत्ती ठळकपणे काम करू लागली आहे.त्या एकविसाव्या शतकातील पहिली आवृत्ती म्हणजे क्रांती मोर्चे,आणि त्यानंतर बहुजन समाजात जाणिव पुर्वक निर्माण केली गेलेली तणावाची परीस्थिती.ही बाब सामाजिक चळवळीत काम करणार्या प्रामाणिक कार्यकर्तांच्या हळूहळू का होईना लक्षात येऊ लागली आहे.हे भयाण वास्तव लक्षात आल्याने बहुजन चळवळीचा एक घटक चिंतेत आहे.या परिस्थितीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी धडपडतो आहे.