Breaking News

सुदृढ समाजासाठी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज- बलकवडे

नशिक, दि. 12 - महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असून, सुदृढ समाजासाठी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी व्यक्त केले.पांडाणे, ता. दिंडोरी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्याक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी बचतगट कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यशाळेत बोलताना प्रेरणा बलकवडे म्हणाल्या की, महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय असेल तर बचत गट चळवळीला टाळता येणार नाही. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत महिला बचत गटांनी देशात, महाराष्ट्रात, अर्थव्यवस्थेत एक निश्‍चित अशी जागा निर्माण केलीय. बचत गट या संकल्पनेला आणि तिच्याशी जोडलेल्या लाखो महिलांना एक सामाजिक स्थान प्राप्त झालंय. कालपर्यंत घराच्या उंबरठया आड असलेल्या या महिला अनेक आर्थिक व्यवहार मोठया आत्मविश्‍वासाने सांभाळतायत. घरात, दारात मानाने वावरता येत. सभेत, बैठकीत हिरिरीने मते मांडताय आहेत. अनेकजणी स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेची पदं, जबाबदार्‍या निभावतायत. सामाजिक, राजकीय प्रश्‍नांवर आवाज उठवतायत. असे असताना नशिक जिल्ह्यामध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्टया अविकसित मोठा वर्गदेखील राहतो. दिवसाच्या शेवटी हाती उरणारी तुटपुंजी रक्कम बायका साडीच्या घडीत, डब्यात लपवून ठेवत. हीच रक्कम बचत गटांत गुंतवली तर सुरक्षित राहते, अडीनडीला कामाला येते, एवढंच नव्हे तर प्रसंगी अत्यल्प दरानं कर्जही मिळू शकतं, हे सगळे फायदे विश्‍वासात घेऊन प्रेरणा बलकवडे यांनी महिलांना पटवून दिले. येत्या महिन्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुक्यावार दौरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पलता उदावंत, सायरा शेख, पूनम बर्वे, अश्‍विनी भालेराव सुषमा गायकवाड, प्रतिक्षा बिल्लाडे, पांडाणे गावच्या सरपंच पर्वता पवार, मीना जाधव, अनिता नेहरे, कमळाबाई गांगोडे, जनाबाई गांगोडे, विमल टेंगारे, सिंधू गांगोडे, ज्योती भोई, सुशीला गांगोडे, राष्ट्रवादी सोशल मिडियाचे संपत कड आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या.