कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणा-या पेट्रोल पंपांना नोटीसा
अहमदनगर, दि. 12 - ग्राहकांना वाहनात पेट्रोल भरून देतांना कमी पेट्रोल देऊन फसवणुक करणा-या अहमदनगर मधील 3 पेट्रोल पंपाच्या चालकांना नोटीसा बजावून ताकीद देण्यात आली आहे. नगर शहरातील 2 व नगर-पुणे महामार्गावर सुपा येथील 1 अशा तीन पेट्रोल पंपाववर कारवाई करण्यात आली आहे. वजनमापे विभागाच्या अधिका-यांनी ही कारवाई केली. अहमदनगरचे नूतन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पेट्रोल पंपांच्या तपासणीचे आदेश दिले होते.उत्तर प्रदेशातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल देतांना प्रत्येक लिटर मागे काही प्रमाणात कमनी पेट्रोल दिले जाते.याची माहिती असल्याने जिल्हाधिकारी महाजन यांनी वजनमापे विभागाला पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.दोन दिवसांपूर्वी विभागाने अचानकपणे पंपांची तपासणी केली. त्यामध्ये नगर शहरात सक्कर चौकाजवळील ओम मातोश्री पेट्रोल पंप,कोठी जवळील एम.एस.ऑटो केअर सेंटर व सुपा येथील एम.एस.दौलत सर्व्हिस सेंटर या तीन पंपांवर प्रत्येक लिटर मागे पेट्रोल कमी दिले जात असल्याचे आढळून आले. नगर मधील पंपांवर एका लिटरमागे 10 मिलीलीटर व सुपा येथील पंपावर 20 मिलीलीटर पेट्रोल कमी दिले जात होते.वजनमापे विभागाचे अधिकारी रमेश दराडे यांनी या तीनही पंपांना नोटीसा बजावून अशी फसवणूक पुन्हा न करण्याची ताकीद दिली आहे. तसेच ज्या नोझलमधून कमी पेट्रोल दिले जात होते,ते नोझल देखील बंद करण्यात आले आहेत.उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक लीटर मागे 25 मिलीलीटर पेक्षा जास्त पेट्रोल कमी दिले जात असेल तरच कारवाई करता येते. त्यामुळे सध्या या तीन पंप चालकांना केवळ ताकीद देण्याची कारवाई करण्यात आली आहे,असे समजते.
