महापालिकेच्या खोदकामामुळे येरवड्यातील सात वीजवाहिन्या तुटल्या
पुणे , दि. 12 - पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात येरवड्यामधील चार तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या 12 तासांतच त्याच खोदकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाणी व सुरु असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी (दि. 11) पहाटे चारच्या सुमारास पुन्हा सात वीजवाहिन्या तुटल्या. परिणामी वाडिया व बंडगार्डन परिसरात विजेच्या भारव्यवस्थापनासाठी तीन तासांचे चक्राकार पद्धतीने दिवसभर भारनियमन करावे लागले. दरम्यान, खोदकाम करणार्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येरवड्यामधील डॉ. आंबेडकर चौकात पुणे महानगरपालिकेकडून पावसाळी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीने खोदकाम काम सुरु आहे. मंगळवारी (दि. 9) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास या खोदकामात चार वीजवाहिन्या तुटल्याने वाडिया व बंडगार्डन परिसरात भारनियमन करावे लागले होते. याशिवाय विश्रांतवाडी परिसरातील काही भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. या तुटलेल्या चारही वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम बुधवारी (दि. 10) दुपारी अडीच वाजता पूर्ण झाले. त्यानंतर नायडू उपकेंद्रातून वाडिया व बंडगार्डन परिसरातील वीजपुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात आला होता.रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रय साळी यांनी आज दिवसभर तेथे उपस्थित राहून दुरुस्ती काम सुरु केले. या वीजवाहिन्यांची दुरुस्ती आज मध्यरात्रीनंतर पूर्ण होईल. या सर्व प्रकारात महावितरणचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे महानगरपालिकेच्या संबंधित कंत्राटदाराविरुद्ध महावितरणकडून येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
