Breaking News

मराठवाडा वॉटर ग्रीडचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा : जलसंपदा मंत्री गिरीष महाजन


मुंबई,दि. 23 : मराठवाडा विभागासाठी ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणारे पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी प्राथमिकता असल्याने या योजनेसाठी लागणार्‍या पाणी आरक्षणाला तत्वता: मान्यता देण्यात येत असल्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रधान सचिव शि.म.उपासे, मुख्य अभियंता तथा विशेष कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गजभिये, संचालक तांत्रिक सदस्य सचिव मराठवाडा ग्रीड डॉ.हेमंत लांडगे, मुख्य अभियंता औरंगाबाद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एस.जी.मुखेडकर, अधिक्षक अभियंता आर.एस.लोलापोड, मुख्य अभियंता वि.ता.तांदळे, कार्यकारी अभियंता अजय सिंह आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मराठवाड्यामध्ये वारंवार उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपातील उपाययोजना न करता कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावे, असे श्री.लोणीकर यांनी दिले. श्री.लोणीकर पुढे म्हणाले की, मराठवाडा विभागासाठी ग्रीड पध्दतीच्या योजनेकरिता पाण्याची मागणी करताना त्या भागातील प्रस्तावित लोकसंख्या व कोणत्या धरणात किती पाणीसाठा उपलब्ध आहे हे विचारात घेऊन धरणनिहाय कोणत्या धरणातून कोणत्या तालुक्याला नागरी व ग्रामीण भागास पाणीपुरवठा करावा लागेल या साठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करावी अशा सूचना दिल्या.
धरण निहाय पाणी मागणी व धरणाचा पाणीसाठा वितरीत करण्यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. या विभागाने धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे की नाही याची खात्री करावी. मराठवाडा ग्रीडसाठी लागणारे पाण्याचे धरणनिहाय पाणी आरक्षण व सर्व धरणातील सध्या असलेले पाणी आरक्षण तसेच लागणारे पाणी आरक्षण यांचे धरण निहाय अभ्यास करुन माहिती तयार करण्याच्या सूचना दिल्या.