Breaking News

कोयना धरणातील पाणी साठा खालावल्याने राज्यावर वीज टंचाईचे सावट ?

मुंबई, दि. 12 - राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने कोयना धरणातील पाण्याचा साठा कमी होत आहे. त्याचा परिणाम कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यात अडचणी येत असल्याने राज्यात विजेचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
धरणातील 67.5 टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. एवढे पाणी वापरून झाले आहे. हे धरण पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणाच्या सीमेवर आहे आणि याची क्षमता 98 टीएमसी इतकी आहे, असे वीज निर्मिती कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले. महाजनकोच्या जलविद्युत प्रकल्पांची एकूण क्षमता 2 हजार 585 मेगावॅट इतकी आहे. त्यापैकी कोयना जलविद्युत प्रकल्पाचा सिंहाचा वाटा असून 1 हजार 956 इतकी वीजनिर्मिती केली जाते. जलविद्युत प्रकल्पातून विजेची मागणी व पुरवठा यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पाण्याच्या कमतरतेमुळे स्थिती आणखी वाईट होईल, असे अधिका-यांनी मान्य केले आहे.
वीजनिर्मितीसाठी पाण्याची उपलब्धता करण्यात अडचणी येत आहेत. 67.5 टीएमसी साठ्याऐवजी 67.541 टीएमसी म्हणजे 0.041 टीएमसी इतका अतिरिक्त साठा वापरला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पूर नियंत्रणासाठी 1.387 टीएमसी पाणी वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. वाटप केलेल्या साठ्याचा भाग म्हणून जलसिंचन विभाग ग्राह्य धरत नसल्याचेही महाजनकोने म्हटले आहे. असे झाले तर 1.346 टीएमसी पाणी वीजनिर्मिती करण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. 1.346 टीएमसी पाणी 59.439 दशलक्ष युनिट वीजनिर्मितीसाठी होऊ शकतो. 67.5 टीएमसी पाण्याचा वापर करण्याची मर्यादा कृष्णा पाणी लवाद प्राधिकरणाने घातली असल्याचेही अधिका-यांनी सांगितले.