Breaking News

शहरातील कौन्सिल हॉल नावाने ओळखला जाणार्‍या सभागृहाचे पुनरुजीवन करा

अहमदनगर, दि. 24 - अहमदनगर हे ऐतिहासिक शहर असून, शहरातील वास्तुंचे वैभव हा एक ठेवा आहे. परंतु खेदाने असे म्हणावेसे वाटते की, या ऐतिहासिक वास्तूंची आठवण आजमितीला शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला होत नाही. हे शहराचे व नगरवासियांचे दुर्देव आहे.  जगभरात वारसास्थळे जपली जातात, परंतु नगर हे एकमेव शहर असे आहे की, सदर वास्तुंची, ऐतिहासिक वारशाची तसेच वैभवाची कोणतीच कदर केली जात नाही. 
अहमदनगर महानगरपालिका या हद्दीतील कौन्सिल हॉल या नावाने ओळखली जाणारी वास्तू या घडीला दुर्लक्षित आहे. महापालिकेच्या आधीही नगरपालिका असताना आणि ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये या वास्तूचे निर्माण केले गेले. नगरपालिका तसेच महानगरपालिकेची जुनी इमारत या नावाने या वस्तुचा परिचय आहे. सुमारे 150 वर्षांपुर्वी निर्माण झालेली ही वास्तु म्हणजेच कौन्सिल हॉल, दि.1 मे 2013 रोजी अचानक लागलेल्या आगीत भस्मासात झाली. आग कशी लागली हे  ज्ञात झालेच नाही. विजेच्या शार्ट सर्किटमुळे आग लागली, असा निष्कर्ष निघाला.
तत्पुर्वी, या कौन्सिल हॉल नामक सभागृहात तत्कालीन नगरपालिका तथा विद्यमान महापालिकेच्या सर्वसाधारण सभा व बैठका तसेच सांस्कृतील कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्यात येत होते. अनेक नामवंत वक्त्यांची या ठिकाणी भाषणे झालेली आहेत. सभा संमेलने तसेच नागरिकांना लहान कार्यक्रमांसाठी सदर सभागृह उपलब्ध होत असे. त्यातून काही प्रमाणात पालिकेला उत्पन्नसुध्दा मिळत असे मध्यवर्ती अहमदनगर शहरात हे सभागृह असल्यामुळे ते सर्वांना सोयीस्कर असे ठिकाण होते. सभागृहामध्ये प्रशस्त व्यासपीठ, 200 व्यक्ती बसू शकतील अशी व्यवस्था तसेच बालकनीदेखील उपलब्ध होते. सभागृहामध्ये ऐतिहासिक व राष्ट्रीय पुरुषांची तैलचित्रे लावलेली होती.
परंतु एका संध्याकाळी अचानक लागलेल्या आगीत सभागृह जळून बेचिराख झाले. लाकडाचा वापर जास्त असल्यामुळे आग झपाट्याने फोफावली. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले व इतर ठिकाणी आग पसरु दिली नाही.  परंतु हळहळण्याखेरीज कोणीही काही करु शकले नाही. तत्कालीन शहर अभियंता यांनी त्यांच्या कार्यकाळात पुणे येथील तज्ञांकडुन सदर वास्तूच्या तांत्रिक तपासण्या करुन घेतल्या. त्या तपासण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आले. त्यामुळे वास्तु परत उभी राहू शकते, परिस्थिती आहे.
कौन्सिल हॉलचे पुनरुजीवन करण्यासाठी नगर नवनिर्माण अभियान लोकशाही मार्गाने निदर्शने व आंदोलने तसेच साखळी व आमरण उपोषण करेल असा इशारा देण्यात आला यामध्ये वसंत लोढा, गिरीष कुलकर्णी, जयंत येलुलकर, मिलिंद गंधे, शाकीरभाई शेख, गजानन लांडगे, एम.डी.कुलकर्णी सुहासभाई मुळे, उदय अनभुले, सोमनाथ चिंतामणी, प्रा.संजय  सातपुते, राजेश बांठीया, उमेश साठे,  उमेश बोरा, राजेश सटाणकर आदि उपस्थित होते.