Breaking News

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना विरोधी पक्षांचा पाठिंबा

नवी दिल्ली, दि. 28 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक झाली. यावेळी विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वो शरद पवार यांना उतरण्यासाठी पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शरद पवार यांचे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वत:हून आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, काल झालेल्या बैठकीनंतर हे चित्र पालटण्याची शक्यता आहे.
सरकारकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यास सहमतीचा नसल्यास विरोधकांच्या आघाडीकडून शरद पवार यांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बोलावलेल्या बैठकीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येच्युरी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, द्रमुकच्या कनिमोझी यांच्यासह सतरा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकारने राष्ट्रपती म्हणून सर्वांच्या सहमतीने उमेदवाराची निवड करावी. मात्र, असे न झाल्यास विरोधी पक्षांकडून शरद पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, असेही सांगण्यात आले.