Breaking News

पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान - पंडित लोणारे

अहमदनगर, दि. 11 - पाण्याचा प्रश्‍न निकाली काढायचा असेल, तर जलयुक्त शिवार अभियानासिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावात कमीत कमी 16 कोटी लिटर पाणी अडवू शकतो. त्यामुळे गाव टँकरमुक्त होार आहे. पडलेल्या पावसाचा थेंब ना थेंब अडवला पाहिजे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी केले.
पोखर्डी येथे ग्रामसभेप्रसंगी श्री. लोणारे बोलत होते. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोसकी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, सरपंच अरुणा जावळे, उपसरपंच रामेश्‍वर निमसे, शेषराव भुसारी, मधुकर पांढरे, संजय मेहेत्रे आदी उपस्थित होते.
लोणारे पुढे म्हणाले की, शेतातील पाणी शेतातच अडवले पाहिजे. प्रत्येक शेतकर्‍याने बांध बंधिस्ती करायला हवी. लोकसहभाग जास्तीत जास्त असेल, तर शासन आपल्या बरोबर राहणार आहे. यांत्रिकीकरणासाठी 50% अनुदान असून, त्याचा फॉर्म भरून देण्याची मुदत 13 मे पर्यंत आहे. ऑनलाईन किंवा गावातील कृषी सहाय्यकाकडे फॉर्म असतो. त्याचा जास्तीत जास्त शेतकर्‍याने लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
ऋषीराज गोसकी म्हणाले की, गावात पुर्नरक्षणाची कामे होणार आहेत. त्या माध्यमातून 80 हजार रिचार्ज शॉप्ट घेणार आहे. गावात पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक यंत्र ठेवणार आहे. भूजल पातळी मोजणार आहे, असे ते म्हणाले.