Breaking News

निवडणुकीच्या तयारीला लागा - उद्धव यांचे आमदारांना आदेश

मुंबई, दि. 05 - पुढील निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या आमदारांना दिले. शिवसेनेच्या  आमदारांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. वस्तू व सेवा कर विधेयकाबाबत येत्या 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात  आली. वस्तू व सेवा कर विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मात्र महापालिकेची स्वायत्ता अबाधित राहणार नसेल, तर आमच्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार  करावा लागेल असे ते म्हणाले.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफी आणि इतर प्रश्‍नांसाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शिवसेना शिवसंपर्क अभियान राबवणार  असून या अभियानाला मराठवाड्यापासून सुरु होणारअसल्याचेही त्यांनी सांगितले. दुस-या टप्प्यात ही यात्रा विदर्भ, उत्तर-पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण इथे राबवली  जाणार आहे. भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्यासाठीच हे अभियान असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल  कोल्हापुरात शिवसेनेकडून केल्या जात असलेल्या अडवणुकीचा उल्लेख करून स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले होते.  या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिलेल्या आदेशाकडे पाहिले जात आहे.
पिंपरी येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतही मध्यावधी निवडणुकीला तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘उत्तर प्रदेशमध्ये  योगी आणि राज्यात निरुपयोगी सरकार आहे.’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी काल केली होती. त्यानंतर आज आमदारांच्या बैठकीत त्यांनी ‘निवडणुकीच्या  तयारीला लागा’ असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.