राज्य शासनाच्या अन्यायकारक अध्यादेशांना एकजुटीने विरोध करु
। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र आठवलेेंचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 09 - राज्यातील बांधकाम व्यवसायिकांच्या अडीअडचणी सोडवून कामातील अडथळे दूर करण्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना 1941 साली झाली आहे. काश्मिर ते कन्याकुमारी असे संपूर्ण भारतात संघटना आज काम करत आहे. आज देशातील सर्व विकास कामे बिल्डर असोसिएशनच्या सदस्यांमार्फत केले जात आहे. मात्र शासन कायम अन्यायकारक अध्यादेश काढून बिल्डर्स व्यवसायिकांना वेठीस धरत आहेत. या अन्याया विरोधात संघटना कायम संघर्ष करत आहे. शासनाच्या या अध्यादेशामध्ये बर्याचवेळा विरोधाभास असल्याने काम करणे अवघड झाले आहे. या अध्यादेशांविरोधात संघटना देश पातळीवर लढा देत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत संघटनेने गार्हाणे मांडले आहे. शासनाच्या अन्यायकारक अध्यादेशांना एकजुटीने विरोध करु. यासाठी सर्व सदस्यांची साथ हवी आहे. नगरच्या सेंटरने आजपर्यंत फार उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील काळातही चांगल्या कामासाठी नगर सेंटरच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करु. नगर सेंटरच्या नूतन अध्यक्ष व पदाधिकार्यांचे अभिनंदन, असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र आठवले यांनी केले.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर सेंटरच्या नूतन पदाधिकार्यांचा पदभार समारंभ संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र आठवले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव एस.बी.तामसेकर यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक झाला. नगर सेंटरचे नूतन अध्यक्ष महेश गुंदेचा यांना अध्यक्षपदाची मानाची पीन लावून श्री.तामसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नूतन सचिव मिलिंद वायकर यांचाही पीन लावून राजेंद्र आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नगर शाखेचे संस्थापक जवाहर मुथा, सेंटरचे मावळते अध्यक्ष दिलीप जगताप, मावळते सचिव अनिल घोडके आदिंसह जिल्ह्यातून आलेले संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नूतन व्हाईस चेअरमन कल्याण माळवदे, खजिनदार निखिल जगताप, डि.बी.जगताप, जवाहर मुथा, शरद मेहेर, अनिल सोनवणे, योगेश गाडे, अशोक चोपडा, भगवान कदम, मिलिंद पागिरे आदि पदाधिकार्यांनी पदभार घेतला.
यावेळी बोलतांना श्री.तामसेकर म्हणाले, नगरमधील अधिक्षक अभियंता असतांनाचा काळ फार काही शिकवून देणारा होता. नगर मधील बिल्डर्स असोसिएशनचे सर्व सदस्य फार सक्रीय आहेत. चांगल्या कॉट्रक्टरशिवाय विकास कामे होवू शकत नाही. मात्र सध्याचा जमाना हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. यासाठी जुन्या पद्धतीने काम करणे चालणार नाही. सर्व बिल्डर व्यवसायिकांनी स्वत:सह सर्व आपल्या अभियंतांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. शासनाच्या अध्यादेशाला घाबरुन न जाता खंबीरपणे तोंड द्या व सर्वबाबींचा अभ्यास करा. नगर सेंटरने महिलांकरीता नवीन संघटना सुरु करुन नूतन अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी फार चांगला उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी नूतन अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी सांगितले की, सर्व सदस्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर टाकून मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासास पात्र राहून मावळते अध्यक्ष दिलीप जगताप यांनी सुरु केलेले चांगले कार्य यापुढील काळात अधिक कार्यक्षमतेने पुढे नेऊ. केवळ एक महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील 25 नवीन सदस्य संघटनेस जोडले आहेत. शासकीय अध्यादेशांसंदर्भात संघटनेच्या सदस्यांना मार्गदर्शनासाठी वेळोवेळी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तसेच अन्यायकारक अध्यादेशांविरोधात हाय कोर्टात अपिल करण्याची तयारी केली आहे.