जिल्हा बँक देणार यंदा 92 कोटींचे पीककर्ज
सोलापूर, दि. 28 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून गेल्या वर्षी पीककर्जेच मिळाली नव्हती. यंदा 92 कोटी 23 लाख रुपये महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेने दिले. सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत त्याच्या वाटपाला मंजुरी घेणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. बँकेचा ’सीआरएआर’ (रोखता सरलता) गेल्या वर्षी घसरला होता. तो सात टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये, असा नियम आहे. गेल्या वर्षीचा सीआरएआर 3.60 टक्के होता. त्यामुळे शिखर बँकेने निधी दिला नाही. यंदा बँकेचा सीआरएआर 11.53 टक्के असल्याने निधी मंजूर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना लवकरच पीककर्जे वाटप होईल, असेही श्री. पाटील म्हणाले. पीककर्जाची रक्कम मिळवण्यासाठी गेल्या वर्षीच्या थकित कर्जाच्या 20 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम भरल्यानंतरच गरजू शेतकर्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असेही ते म्हणाले.
