Breaking News

पनवेलमध्ये 77 हजारांची दारू जप्त; तिघांना अटक

पनवेल, दि. 24 - पनवेलमध्ये 24 मे रोजी होणार्‍या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नुकतीच कळंबोली परिसरातून सुमारे 77 हजार रूपये  किमतीची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि भरारी पथकाच्या संयुक्त कारवाईत 77 हजार 792 रूपये किमतीची देशी  आणि विदेशी दारु जप्त करण्यात आली असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
नॅनो गाडीतून (एमएच 14 डीए 4991) सुमारे 67.68 ब.लीटर देशी दारू आणि 4.32 ब.लीटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. भेकू म्हात्रे, उज्वला रामचंद्र म्हात्रे  आणि चालक विजय कुमार झा अशी तिघांची नावे असून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 अ, ई 81 व 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. यापैकी दोन जण आसूडगाव येथील तर एक जण खारघर येथील रहिवासी आहे. यातील महिला आरोपी स्वतःचा दारूविक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगत  आहे, अशी माहिती भरारी पथकाचे प्रकाश दाते यांनी दिली. त्यानंतर या तिघांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यानुसार अनेक भरारी  पथके संशयास्पद घटनांवर नजर ठेऊन आहेत.