उत्तर प्रदेशमध्ये विजेच्या खांबावर आदळून बसचा अपघात; 6 जणांचा मृत्यू
लखनौ, दि. 21 - उत्तर प्रदेशमधील बांदा येथील जसपुर जिल्ह्यात परिवहन महामंडळाची बस एका विजेच्या खांबावर आदळून झालेल्या अपघातात 6 जण मृत्युमुखी पडले. या बसला आग लागल्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या अपघातात 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस बांदाहून हमीरपुरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर बसचा चालक आणि कंडक्टर फरार झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज बांदा येथे असतानाच हा अपघात घडला. आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत.