Breaking News

इंडियन सफारी, नाईट सफारीचे काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 - गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील इंडियन तसेच नाईट सफारीचे काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज दिल्या. गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील कामाचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. गोरेवाडा प्राणीसंग्रहालय पब्लिक प्रायव्हेट  प्रोजेक्ट संदर्भातील बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यसचिव सुमित मल्लिक,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेसी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, नागपूर महानगरपालिका आयुक्त अश्‍विन मुद्गल, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक यु.के. अग्रवाल, विभागीय व्यवस्थापक जे.पी.त्रिपाठी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
खाजगी-सार्वजनिक सहभागातून नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोरेवाडा प्राणीसंग्रहालय विकसित करण्यात येत आहे. 25.57 हेक्टरची अतिरिक्त सुयोग्य वनेतर  जमीन उपलब्ध करून देणे, नाईट सफारी तसेच इंडियन सफारीच्या कामास गती देणे यासारख्या विषयाबरोबर गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील इतर कामांच्या  प्रगतीबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात इंडियन सफारी, अफ्रिकन सफारी, बायोपार्क, नाईटसफारी, पायवाटा, बायोपार्क, निमल केअर  सेंटर,रेस्क्यू सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयामुळे नागपूर शहर व परिसरात पर्यटनाला चालना मिळतांना रोजगार संधीत वाढ होणार आहे.  दुर्मिळ व लुप्त होत असलेल्या प्रांण्यांचे प्रजनन करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करण्याच्या हेतूने या प्राणीसंग्रहालयात काम होणार आहे.