Breaking News

नगर तालुक्यातील 17 गावांमध्ये दारूबंदीचे ठराव मंजूर

अहमदनगर, दि. 07 - दारूबंदी करण्याच्या दिशेने नगर जिल्ह्यातील गावांनी दमदार वाटचाल सुरू केली आहे. नुकत्याच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील  बहुतांश गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी नगर तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये ग्रामसभांनी दारूबंदीचे ठराव मंजूर केले आहेत. त्या  बरोबरच गावांमधील अवैध व्यवसायांवर बंदी, डीजे बंदी व फ्लेक्स लावण्यावर बंदी अशा अनेक महत्वाच्या विषयांवरदेखील ग्रामसभांनी एकमताने निर्णय घेतले  आहेत. नगर तालुक्यातील वडारवाडी, गुंडेगाव, सारोळाबद्दी आदी गावांनी ग्रामसभांमध्ये सर्वानुमते दारूबंदीचे ठराव मंजूर केले आहेत. ग्रामसभांमध्ये गावातील  कोणत्याही अवैध धंदे, दारू बंदी, डीजे बंदीसारखे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच पुढील काळात गावांमध्ये कोणत्याही परिस्थतीत देशी-विदेशी दारू  विक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी ना-हरकत दाखला न देण्याचाही निर्णय ही या 17 गांवानी घेतला आहे.