Breaking News

मराठवाड्यातील 11,457 रास्त भाव दुकानात ई-पॉज मशिनद्वारे व्यवहार

औरंगाबाद, दि. 12 - मराठवाड्याच्या एकूण 8 जिल्ह्यातील 11,457 रास्त भाव दुकानात ई-पॉज मशिनद्वारे धान्य वाटपाचे आणि रक्कम अदा करण्यासह सर्व व्यवहार केले जाणार असून आतापर्यंत 6448 रास्त दुकानात ई-पॉज मशिन्स स्थापित झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाड्यातील सर्व अन्न, धान्य पुरवठा बायोमॅट्रीक पद्धतीने करण्यासंबंधात आयोजित बैठकीत प्रधान सचिव महेश पाठक बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त वर्षा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ई-पॉज मशिन्स बसविण्याचे काम जिल्हानिहाय तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येत आहे. तिस-या टप्प्यामध्ये औरंगाबाद, परभणी, बीड यांचा समावेश आहे. लातूर, नांदेड, जालना, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यात ई-पॉज मशिन बसविण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी 1 हजार ई-पॉज मशिन्स प्राप्त झाले आहेत, तर परभणी आणि बीडसाठी मशिन्स अप्राप्त आहेत. ई-पॉज मशिन बसवितांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे, असे सांगून महेश पाठक म्हणाले की, अन्न, धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हानिहाय 77 संगणक वितरीत करण्यात आले. हे संगणक जिल्हा पुरवठा कार्यालयापासून ते तहसील व गोदामापर्यंत कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे.
गोदामामध्ये लॅपटॉपदेखील पुरविण्यात येत आहे. त्यामुळे आता गोदामामध्ये व रास्त भाव दुकानात झालेले धान्य वितरण कोणालाही ऑनलाईन पाहता येईल. रास्त भाव दुकानदारांना चलनाने बँकेत रक्कमा भराव्या लागायच्या, आता मात्र रास्त भाव दुकानदारांना ऑनलाईन चलन भरता येणार आहे. मराठवाड्यातील एकूण 11,457 रास्त भाव दुकानदारांनी जि.आर.ए.एस. प्रणालीद्वारे 10,238 चलन भरले आहेत. सर्व शिधापत्रिकांचे आधार सिडींग मराठवाड्यात 99 टक्के झाले आहे. मराडवाड्यात एकूण 47,38,067 एवढ्या शिधापत्रिका आहेत. त्याचप्रमाणे 11,457 रास्त भाव दुकानदार व त्यांचेकडील कार्ड व त्यावरील लाभार्थ्यांच्या खात्याचे आधार कार्डशी लिंकअप करण्यात आले आहे. आतापर्यंत 54,69,475 एवढ्या आधारशी बँक खाते लिंक झाले आहे, अशीही माहिती यावेळी सांगण्यात आली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बायोमॅट्रीकमुळे औरंगाबाद जिल्ह्याची पारदर्शक ओळख निर्माण होणार आहे. जिल्ह्याला दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल. प्रचार व प्रसिद्धी वर भर देण्यात येईल. रास्त भाव दुकानात धान्य आल्याचे एस.एम. एस. शिधापत्रिका धारकांना पाठविले जातात, अशी माहिती दिली. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर (नांदेड), एस. आय. पठाण (हिंगोली), श्रीमती शोभा जाधव (लातूर), राजू नांदकर (जालना), सुनील महेंद्रकर (परभणी), राजेंद्र वाघ (बीड), अरविंद लाटकर (उस्मानाबाद), भारत कदम (औरंगाबाद) यांच्यासह पुरवठा खात्यातील इतर अधिकारी उपस्थित होते.