Breaking News

नागवाडीत 10 तोळे सोन्याची चोरी

अकोले, दि. 11 - तालुक्यातील समशेरपूरच्या नागवाडी येथील दत्तू कारभारी ढोन्नर यांचे घरातील 10 तोळे सोने लंपास झाले असल्याची तक्रार अकोले पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, दत्तू ढोन्नर रा. नागवाडी - समशेरपूर येथील त्यांचे वडिलोपार्जित शेत जमीन आहे. त्यांना एक भाऊ, भावजय व वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. श्री. ढोन्नर यांच्या भावाच्या मुलीचे लग्न 16 मे रोजी ठरलेले असताना लग्नासाठी यांनी समशेरपूर येथील सोनार संजय बेदरकर यांचेकडून 6 तोळे सोने तयार करून घेतले होते.
5 मे रोजी ढोन्नर लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. यादिवशी दुपारी 2 ते साडेतीन वाजेच्या सुमारास अकोले पोलीस स्टेशन येथील पोलीस गाडी ढोन्नर यांच्या घरी आली. घरी ढोन्नर यांच्या त्यांच्या पत्नी, वडील, पुतणी योगिता, भाऊ सुभाष घरी होते. गाडीमध्ये हे.कॉ.भांगरे तसेच मदतनीस ढोकणे व त्यांचे दोन साथीदार होते. तसेच त्यांचे सोबत गावातीलच सुनिता बेनके, संगीता शेलार उर्फ संगीता पापळ अशा दोन महिला देखील होत्या. या दोन महिला व पोलीस हे श्री. ढोन्नर यांच्या घरात घुसले व तुमच्या घरात दारू लपवून ठेवलेली आहे, तुम्ही चोरून दारू विकता, ते तपासण्यासाठी आलेलो आहे असे सांगत घराची झडती सुरु केली.
ढोन्नर यांचे कुटुंबायांनी ही माहिती खोटी आहे असे सांगत विनवणी केली. विनाकारण आमच्यावर संशय घेऊ नका, आमचे सांप्रदायिक कुटुंब आहे. परंतु पोलिसांनी कोणाचेही काही ऐकून घेतले नाही. व सरळ घरात घुसले व घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर काढून घरातील सामानाची उचकापाचक सुरु केली. घरातील सर्व समान तपासून घेत घराबाहेर पडले. श्री. ढोन्नर हे घरी आल्यानंतर सर्व प्रकार कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सांगितला. त्यांनी घरातील सर्व समान तपासले असता त्यांनी लग्नासाठी तयार करून आणलेले 6 तोळे दागिने व घरातील 4 तोळे दागिने असे एकूण 10 तोळे सोन्याचे दागिने गहाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुपारी घेतलेल्या घराच्या झाडाझडतीत पोलीस व त्यांच्या बरोबर आलेल्या महिलांनीच हे दागिने लंपास केले असल्याचे दत्तु ढोन्नर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
पुतणीचे लग्न अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपले असता हा प्रकार घडला. तरी वरील प्रकार गंभीर असून पोलिसांना कोणत्याही प्रकारचे घरातील झडतीबद्दल कायदेशीर आदेश नसतांना तसेच कुटुंबातील कोणत्याही माणसांना लेखी अथवा तोंडी समज न देता त्यांनी घरात घुसून वरील प्रकार केला. या प्रकाराला पोलीस व त्यांच्या सोबत असलेल्या महिला या जबाबदार आहेत. यावर त्यांनी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. वरील सर्व आरोपींची चौकशी व्हावी व गहाळ झालेले दागिने परत मिळावेत व दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी दत्तु ढोन्नर यांनी केली आहे.