Breaking News

रोखड रहित व्यवहाराने अर्थव्यवस्थेला चांगली शिस्त : जिल्हाधिकारी

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : नोट बंदीच्या निर्णयानंतर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला चांगली शिस्त लागली असून रोखड रहित व्यवहाराला महत्व प्राप्त झाले आहे. सर्व बॅकांनी रोखड रहित व्यवहाराविषयी जनजागृती करुन समाजातील प्रत्येक घटक रोखड रहित व्यवहाराकडे वळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी केले.
येथील नियोजन भवनात बँक ऑफ महाराष्ट्र आणि जिल्हा प्रशासनातर्फे डिजीधन मेळाव्याच्या समारोप समारंभात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मुद्गल बोलत होते. प्रारंभी स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा विभागातर्फे व बॅकांतर्फे व्यापार्‍यांना पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक हरिश्‍चंद्र माझीरे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक महादेव शिरोळकर, तहसीलदार विवेक जाधव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.
रोखड रहित व्यवहार हा अत्यंत सुटसुटीत असा व्यवहार आहे. हा व्यवहार करताना कोणतीही अडचण येत नाही, असे सांगून मुद्गल म्हणाले, रोखड रहित व्यवहार हा बँक खाते, मोबाईल व आधार कार्ड या तीन गोष्टींवर अवलंबून आहे. रोखड रहित व्यवहारामुळे देशात नवीन अर्थ व्यवस्था निर्माण झाली आहे. 561 बँक शाखांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जनधन योजनेची सातारा जिल्ह्यात 4 लाख 62 हजार बचत खाती उघडून बँकांनी खूप चांगले काम केले आहे. शासनाच्या विविध योजना राबविण्यात बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर असते. केंद्र शासनाने रोखड रहित व्यवहारांसाठी भीम अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. भीम अ‍ॅप्लिकेशन हे मोबाईलवर डाऊनलोड करुन घ्यावे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे व्यवहार करु शकता. पीओएस, इंटरनेट बँकींग यासारख्या नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे. सर्व नगर परिषदांचे कर आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासनाचे सर्व विभाग पुढील काळात कॅशलेस होतील. प्रत्येक नागरिकाने रोखड रहित व्यवहार करुन देशाच्या विकासात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन मुद्गल यांनी केले.
सूत्रसंचालन शिरोळकर यांनी केले. तर आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मानले. या कार्यक्रमात नागपूर येथे अंतिम डिजीधन मेळावा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी पाहण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, बँकांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.