Breaking News

पनवेल महापालिकेत भाजप स्वबळावर, आ. प्रशांत ठाकूर यांचे संकेत

नवी मुंबई, दि. 29 - पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी तसे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. पण, अद्यापही शिवसेनेककडून युतीचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळं शिवसेना कुठलीच भूमिका घेत नसल्यानं सध्या तरी भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केल्याचं चित्रं आहे.
पनवेल महापालिकेसाठी 24 मे रोजी मतदान होणार असून, महापालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित येऊन महाआघाडी स्थापन केली आहे. तर दुसरीकडे सेना आणि भाजपची स्वबळाची तयारी सुरु असल्याने, महापालिकेत तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपला प्रचाराचा मेगाप्लॅन तयार केला आहे. मंगळवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत निवडणूक प्रचाराचे सर्व नियोजन करण्यात आलं. यात 12 मे रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेनं शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. तर 21 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने प्रचाराचा समारोप केला जाणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेलमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी या महाआघाडीचा प्रयोग केला आहे.