Breaking News

अखेर एअर इंडियाने खा. रवींद्र गायकवाडांवरील बंदी हटवली!

नवी दिल्ली, दि. 07 - शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदी एअर इंडियाने अखेर मागे घेतली आहे. जवळपास दोन आठवड्यांनी ही बंदी हटवण्यात आली आहे. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने आपला निर्णय मागे घेतला. मात्र गायकवाड यांनी माफी माघावी अशी भूमिका एअर इंडियाने घेतली होती. पण मी संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही असं रवींद्र गायकवाड यांनी काल म्हटलं होतं.
खा. गायकवाड यांचा पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या कर्मचार्‍याशी वाद झाला होता.  23 मार्चला घडलेल्या या घटनेत खा. गायकवाड यांनी आपण कर्मचार्‍याला सँडलने मारल्याचं कबुल केलं होतं. मात्र काल लोकसभेत निवेदन देताना, गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍याने धक्का दिल्याने आपणही धक्का दिल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही लक्ष घातलं होतं. अखेर 15 दिवसांनी एअर इंडियाने गायकवाडांवरील विमानप्रवास बंदी हटवली आहे.