Breaking News

वाई-धोम हत्याकांडाचे खटले एकत्रित चालवण्याच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : वाई-धोम हत्याकांडातील सर्व खटले एकत्रित चालवण्याच्या सरकार पक्षाच्या अर्जावरील सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून दि. 15 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सर्व खटले एकत्रित चालवावेत. वेगवेगळे खटले चालवल्यास पुनरावृत्ती होवून साक्षीदारांची अडचण होईल, असा युक्तिवाद सरकार पक्षाच्यावतीने केला. याउलट या घटनेतील साक्षीदार वेगवेगळे आहेत. घटना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे वाई हत्याकांडाचे खटले वेगवेगळे चालवावेत, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. 
वाई-धोम हत्याकांड खटल्याच्या झालेल्या सुनावणीत वाई हत्याकांड खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, असा अर्ज सरकार पक्षाने केला आहे. त्यावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित राहून सर्व खटले एकत्रित चालवावेत, असा न्यायालयात युक्तिवाद केला. यामध्ये प्रामुख्याने चार महत्त्वपूर्ण मुद्दे न्यायालयासमोर मांडताना ते म्हणाले, संशयित आरोपी संतोष पोळ याने सर्व खून पैसे, दागिन्यांसाठी केले आहेत. सहा खून केल्यानंतर सर्व मृतदेह पोळ याने सांगितल्याप्रमाणेच ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याने ज्योतीला पहिले तीन खून केल्याची माहिती देवून उर्वरीत खुनासाठी तिची मदत घेतली आहे. 13 वर्षात जे खून झाले त्याची माहिती ज्योती मांढरे हिला आहे. त्यामुळे खटले वेगवेगळे चालले तर वारंवार पुनरावृत्ती होणार आहे.
सरकार पक्षाच्यावतीने याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देण्यात आले. यामध्ये कोल्हापूर येथील बाल हत्याकांडामध्ये खुनांची घटना कोल्हापूर, नाशिक, मुंबई येथे घडली आहे. मुंबई बाँबस्फोट प्रकरणाचाही त्यांनी संदर्भ देवून वाई हत्याकांडाचे खटले एकत्रितरीत्या चालवले जावेत, अशी मागणी न्यायालयास केली.
बचाव पक्षाने आपल्या युक्तिवादात सर्व घटनेत तपासी अधिकारी, साक्षीदार वेगवेगळे आहेत. खुनाची पध्दत व खुनाची कारणे वेगवेगळी आहेत. सर्व खटले एकत्रित चालवल्यास संशयित आरोपीला बचाव करता येणार नाही. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी दि. 15 मे रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.