Breaking News

प्लॅस्टिक राष्ट्रध्वजावर बंदी : जिल्हाधिकारी

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून 1 मे या महाराष्ट्र दिनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
गृहविभागाने 22 एप्रिल 2015 रोजी याबाबत परिपत्रक प्रसिध्द केले आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतरत्र पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 व राष्ट्रीय अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद केली आहे.
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तसेच महाराष्ट्र दिन या समारंभावेळी स्थानिक जनतेमार्फत राष्ट्रप्रेम दर्शविण्यासाठी छोट्या-छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 नुसार कारवाई करण्यात येते. काहीवेळा समारंभात वैयक्तिक वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज इतस्तत: रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात. हे दृश्य राष्ट्र प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाच्या वापरानंतर एकतर त्याचा योग्य मान राहील याप्रमाणे ठेवण्यात यावेत. अन्यथा जर राष्ट्रध्वज खराब झालेले असतील तर त्यांचा योग्य तो मान राखून ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. अशा प्रसंगी असे रस्त्यात पडलेले, इतस्तत: विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लॅस्टिकचे असतील तर प्लॅस्टिक बरेच दिवस नष्ट होत नाहीत. राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याच्या केंद्रशासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कलम 1971 कलम 2 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा सिंघल यांनी दिला.