Breaking News

बाजारबुणग्यांचा प्रतिगाम्यांशी असंग

दि. 24, एप्रिल - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु  संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अ‍ॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...
महाराष्ट्राच्या मातीत पुरोगामी विचारसरणीने सामाजिक सलोख्याचे रोपटे कोमेजत आहे,या रोपट्याला पोषक खाद्य पुरविण्याची जबाबदारी असलेले पुरोगामीत्वाचे कथित वारस विष पेरू लागल्याने या रोपट्याची वाढच खुंटली असे नाही तर रोगग्रस्त झाल्याने कोणत्याही क्षणी ते होत्याचे नव्हते होईल अशी दुरावस्था सध्या सामाजिक चळवळीची झाली आहे.
फुले शाहू आंबेडकर या महापुरूषांनी छञपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याला अपेक्षित असलेल्या चौकटीत बसविण्यासाठी हयात खर्च केली. त्यांनी सुरू केलेल्या या सामाजिक सुधारणा घडवून आणणार्या चळवळीला पुरोगामी असे गोंडस नामाभिधान मिळालं. समाजातील रूढी परंपरांना फाटा देत असतांना समाजाचा आर्थिक शैक्षणिक सामाजिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असतांनाच सामाजिक सलोखा वाढीस लागावा म्हणून या महानुभवांनी तत्कालीन समाजात असलेली दरी,जातपाताची भिंत पाडण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले.
विचारांवर असलेली निष्ठा,सामाजिक बांधिलकी आणि हेतूविषयी असलेला  निरपेक्ष जिव्हाळा यामुळे तत्कालीन समाजानेही त्यांना सोबत करून प्रामाणिक साथ दिली,त्याचा सकारात्मक परिणाम दिसला आणि हा विचार समाजाने स्वीकारला. या महापुरूषांच्या पश्‍चात पुरोगामी विचारसरणीचे व्रत स्वीकारून काही मंडळीनी तो वारसा सुरू ठेवला. विशेषतः स्वातंञ्योत्तर भारतात 1956 नंतर म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर बरीच वर्ष समाज परिवर्तनाच्या चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन काही वारकरी सामाजिक सलोख्याच्या पंढरीला निघाले होते.त्या पिढीतील अनेक जण आज हयात नाहीत. माञ त्यांनी घडविलेली पिढी आजही या परिवर्तन चळवळीच्या व्यासपीठावरून पुरोगामीत्वाचे भजन गाऊन समाजप्रबोधन करीत आहेत.ही बाब सकारात्मक असली तरी काही नकारात्मक प्रवृत्तींचा या चळवळीत झालेला शिरकाव चळवळीच्या मुळावर उठू लागला आहे. पुरोगामी चळवळीचा बाजार मांडून काही बाजारबुणगे दलालीचा धंदा करू लागले आहेत.गेल्या दहा बारा वर्षात या चळवळीला या बाजारबुणग्यांची वाळवी कुरतडू लागल्याने चळवळीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.सत्तेच्या उबेला राहून कमाई करण्यासाठी चळवळ प्रतिगाम्यांच्या दावणीला बांधण्याचे पाप हे दलाल करीत आहेत. अलिकडच्या दोन वर्षात या दलालांचे कुट कारस्थान पडद्यावर ठळकपणे दिसू लागले आहे.गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात निपजलेली बहुजन अस्मितेची संस्कृती याच दलाल मंडळींनी प्रतिगाम्यांशी केलेल्या असंगाचे अनौरस अपत्य आहे. या दलालीच्या धंद्यावर पोट भरू पाहणार्‍या बाजारबुणग्यांचा पर्दाफाश करणारी मुलाखत लवकरच...