Breaking News

विजय मल्ल्याच्या गोव्यातील ’किंगफिशर व्हिलाला नवा मालक

मुंबई, दि. 08 -  कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या गोव्यातील आलिशान व्हिलाला अखेर मालक मिळाला आहे. तेलुगू अभिनेता, प्रसिद्ध उद्योगपती सचिन जोशीने तब्बल 73 कोटींपेक्षा अधिक किमतीला किंगफिशर व्हिला विकत घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बँकेकडून मल्ल्याचा व्हिला विकण्यासाठी लिलाव सुरु होता. मात्र हा शानदार बंगला विकत घेण्यासाठी कोणीही खरेदीदार पुढे येत नव्हता. अखेर अभिनेते सचिन जोशीनं यांनी हा व्हिला विकत घेण्याची तयारी दर्शवली.
32 वर्षीय सचिन जोशी हे ‘जेएमजे ग्रुप ऑफ कंपनीज्’चे उपाध्यक्ष असल्याचं त्यांच्या वेबसाईटवर लिहिलं आहे. अझान, मुंबई मिरर, जॅकपॉट यासारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले होते. गोव्याच्या कंडोलिम भागात असलेला हा शानदार व्हिला विकत घेण्यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील डझनभर उद्योगपतींनी आणि एका मीडिया ग्रुपने रस दाखवला होता. मात्र सप्टेंबरमध्ये 85 कोटींची रक्कम जाहीर झाल्यावर फार कोणी पुढे आलं नाही. त्यानंतर ही रक्कम कमी करुन 73 कोटींवर आणण्याती आली. लिलावात ठरलेल्या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत या व्हिलासाठी मोजावी लागेल. त्यामुळे जोशींना 73 कोटींपेक्षा जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.