Breaking News

राम मंदिरासाठी तुरुंगात आणि फाशीवरही जाईन : उमा भारती

लखनौ, दि. 09 - राम मंदिर हा आपल्या आस्थेचा, विश्‍वासाचा आणि अभिमानाचा विषय आहे, त्यासाठी तुरुंगात आणि वेळ पडलीच तर फाशीवर जाईल, असं वक्तव्य केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भेट झाल्यानंतर राम मंदिर विषयावर चर्चा झाली का, असा प्रश्‍न उमा भारती यांना विचारण्यात आला होता.
राम मंदिर या विषयावर योगी आदित्यनाथ आणि मला बोलण्याची गरज नाही. दोघांनाही हा विषय परिचित आहे. मात्र सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर फार बोलणार नाही, असंही उमा भारती म्हणाल्या. राम मंदिर प्रकरण हे संवेदनशील मुद्दा आहे, दोन्ही पक्षांनी कोर्टाबाहेरच हा विषय संपवावा, गरज लागल्यास कोर्ट मध्यस्थी करेल, असं सुप्रीम कोर्टाने नुकत्याच झालेल्या एका सुनावणीत म्हटलं होतं.