Breaking News

नोकरदार, व्यापारी यांना वगळून शेतकरी कर्जमाफी द्यावी : अमर हबीब

बीड, दि. 09 - सरकारने कर्जमाफी करत असताना सरकारी नोकर आणि आयकर भरणार्‍या लोकांना यातून वगळायला पाहिजे, असं मत शेतीचे अभ्यासक अमर हबीब यांनी व्यक्त केलं आहे. नोकरदार, व्यापारी, मोठे व्यावसायिक आणि पुढारी हे शेतकर्‍यांच्या नावावर सरकारी तिजोरीवर डल्ला मारू पाहत आहेत. त्यांचा डाव उधळून  लावायला पाहिजे. ज्या शेतकर्‍यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्यांना जास्तीजास्त लाभ या कर्जमाफीतून मिळाला पाहिजे, असं अमर हबीब म्हणाले.
ज्या शेतकर्‍यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, तो खरा शेतकरी, अशी कायद्याने त्याची व्याख्या केलेली आहे. मात्र सरकार बेकायदेशीरपणे यात नोकरदारांना सामावून घेत आहे, असा आरोपही अमर हबीब यांनी केला. केवळ शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला जास्त पैसे लागणार नाहीत. त्यामुळे कर्जमाफीची मागणी करणार्‍यांनी फक्त शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणी करायला पाहिजे, असंही अमर हबीब म्हणाले.