Breaking News

आंबेडकरांचे ग्रंथप्रेम समाजाने अंगीकारणे काळाची गरज - जयश्री शेळके

पुस्तकमैत्री बालवाचनालयात बाबासाहेबांना अभिवादन

बुलडाणा, दि. 15 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खरी ओळख ही ग्रंथप्रेमी, ज्ञानाचे उपासक अशी आहे. समाजात आज सर्व स्तरातील वाचनप्रेम कमी होतआहे. समाजातील वाचनप्रेम वृद्धिंगत होण्यासाठी समाजाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम मोठ्या प्रमाणात अंगिकारण्याची गरज आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई शेळके यांनी पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर जयंती उत्सवात व्यक्त केले.
आज स्थानिक चांडक ले-आऊट मधील पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या मुख्य केंद्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 126 वी जयंती प्रा.डॉ.अनंत सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई शेळके, साहित्यिक सुरेश साबळे, सुभाष किन्होळकर, सौ.मृणालताई सपकाळ, शाहिणाताई पठाण प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पुस्तकमैत्री वाचनालयाचे कार्यकर्ते शिवशंकर गोरे यांना शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.अनंत सिरसाट यांच्या हस्ते पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नरेंद्र लांजेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी युनोने आजचा दिवस हा ‘विश्‍व ज्ञान दिवस’ म्हणून जाहीर केल्याबद्दल आनंद व्यक्त करून पुस्तकमैत्रीच्यावतीने दरवर्षी हा दिवस विश्‍व ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली. बालसाहित्यिक सुभाष किन्होळकर यांनी “कळीकळीत बाबा तू, मनामनात बाबा तू, उपेक्षितांच्या शोषितांच्या स्वरास्वरात बाबा तू’’ ही स्वरचित कविता सादर करून आंबेडकरांना काव्यांजली अर्पण केली. कु. जान्हवी गोरे आणि कु. मैत्री लांजेवार यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर एक गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवीकिरण टाकळकर यांनी केले तर सर्व उपस्थितांचेआभार शाहिणाताई पठाण यांनी मानले. याप्रसंगी प्रामुख्याने बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, पत्रकार अरूण जैन, विवेक चांदूरकर, प्रा. सुनिल देशमुख, डॉ. गणेश गायकवाड, अंजलीताई परांजपे, डॉ. प्रमोद टाले, महेंद्र सौभागे, अजय दराखे, मिलींद चिंचोळकर, डी.डी.देशमुख, प्रा.विनोद देशमुख, कुंदाताई मर्ढेकर, सौ. प्रज्ञा लांजेवार, गजानन देशमुख, अमोल सातपुते, पंजाबराव गायकवाड इत्यादींसह मोठ्या प्रमाणावर लहान मुलं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.