Breaking News

खुरमपूर येथील आगीत लाखो रुपयांचे नुकसान

बुलडाणा, दि. 17 - तालुक्यातील खुरमपुर गावात 15 एप्रिल रोजी दुपारी अचानक लागलेल्या आगीत शेतातील गोठे, बैलगाडी, पाईप, वैरण व  शेतातील इतर साहित्य जळून 2 लाख 81 हजार 600 रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली. 
याबाबत अधिक माहिती अशी की, खुरमपुर गावातील  अवघे 39 वर्ष वय असलेल्या शिवाजी घुले या तरुणाचा औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात तापाने मृत्यू झाल्याने गावात स्वाईन फ्ल्युच्या भितीचे वातावरण होते. या घटनेचे दुख: गावकार्‍यांच्या मनावर असतानाच 15 एप्रिल रोजी दुपारी गावाशेजारीच असलेल्या शेतामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतातील गोठे, बैलगाडी, पाईप, वैरण व शेतातील इतर साहित्य जळून सुमारे 2 लाख 81 हजार 600 रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच तहसीदार सुरेश कव्हळे यांनी तलाठी आर.व्ही.भाकडे यांना घटनास्थळी पाठविले. तहसीलदारांच्या मार्गदर्शनानुसार तलाठी आर.व्ही.भाकडे यांनी पंचनामा केला. यावेळी ग्रामसेवक ए.पी.आघाव, सरपंच,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकरी उपस्थित होते. अचानक लागलेल्या आगीमध्ये  तान्हाजी फुला राठोड, विठठ्ल फुला राठोड, अर्जुन फुला राठोड, दशरथ हरसिंग राठोड, श्रीराम लिंबाजी टेकाळे या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. आग लागली ते ठिकाण गावापासून किमान 1 कि.मी. असल्यामुळे आग विझविण्यासाठी काहीही करता आले नाही. यामुळे काही निर्णय घेण्याच्या आत आगीत शेतातील गोठे व इतर साहित्य  जळून खाक झाले, अशी माहिती ग्रामसेवक ए.पी.आघाव यांनी दिली.