Breaking News

’मी मुख्यमंत्री बोलतोय’, फडणवीसांचा शेतकर्‍यांशी संवाद

मुंबई, दि. 09 - मुख्यमंत्र्यांना जनतेशी संवाद साधता यावा, म्हणून ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम टीव्हीवर सुरु होत आहे. आजपासून दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता डीडी सह्याद्री वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे. ‘संकल्प शाश्‍वत शेतीचा’ या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना आवाहन केलं आहे. या कार्यक्रमासाठी शेतकर्‍यांकडून व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेलच्या माध्यमातून प्रश्‍न मागवण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या काही निवडक शेतकर्‍यांशी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला आहे.
राज्यातल्या 30 शेतकर्‍यांना या कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न विचारता आले. पंतप्रधान नरेंद मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतील. गेल्या काही दिवसापासून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन विरोधक आणि शिवसेना भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही करत आहेत. दुसरीकडे विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून सरकारला टार्गेट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार होऊ नये यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकर्‍यांशी संवाद  साधण्याचा निर्णय घेतला आहे.