Breaking News

एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ

मुंबई, दि. 08 - राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एसटी कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. एसटी महामंडळाच्या कनिष्ठ वेतनश्रेणीतील 12 हजार 514 कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. शिवाय कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष करण्यात आला आहे. विधान परिषदेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. 1 एप्रिल 2017 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, ही कर्मचार्‍यांची मागणी होती. मात्र ती रद्द न करता तिचा कालावधी एक वर्ष एवढा करण्यात आला आहे.
कनिष्ठ वेतनश्रेणीत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर वेतनात 500 रुपयांनी वाढ करण्यात येईल. एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केल्यानंतर सर्व कर्मचार्‍यांना वरिष्ठ  वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल, असं दिवाकर रावते यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी 2000 साली लागू करण्यात आली. सेवेत रुजू  झाल्यानंतर 5 वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करण्याची त्यावेळी तरतूद करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षांनंतर कर्मचार्‍यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ होतो.