Breaking News

शाश्‍वत शेतीसाठी पाणी देण्यास शासन कटीबध्द : ना. महाजन

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शेतकरी हा केंद्र बिंदू मानून राज्याचा अर्थसंकल्प तयार केला आहे. शेतकर्‍यांच्या शाश्‍वत शेतीसाठी पाणी देण्यास शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
धोम बलकवडी प्रकल्पातील पाणी पूजन व उजवा कालवा कि. मी. 140 मधील अंतिम टप्प्यातील कालव्याच्या कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते मौजे मिरढे (पोकळेवाडा) ता. फलटण येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. याप्रसंगी  पशुसवंर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा. ब. घोटे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे यावेळी उपस्थित होते.
अंतिम टप्प्यातील काम हे येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण होईल, असे सांगून जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, या कामासाठी निधी पूर्णपणे उपलब्ध झाला आहे. या अंतिम टप्प्यातील कामांवर शासनाचे लक्ष असून हे वेळेत पूर्ण केले जाणार आहे. तसेच राज्यातील इतर अपूर्ण प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी पाण्याबरोबरच खतांचा पुरवठा करणार आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागते. शेतकर्‍यांना ऊसाचे पिक घ्यायचे असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. यामुळे उत्पादनात वाढ होवून जमिनीची सुपीकता टिकून राहते. या भागात अधिक काम करण्याची गरज आहे. पुढील महिन्यात या भागाचा पुन्हा दौरा करणार असून हा भाग कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन जलसंपदा मंत्री महाजन यांनी शेवटी दिले.
अध्यक्षीय भाषणात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, या भागात काही महिन्यात पाणी येईल. शेतकर्‍यांनी ऊस पीकाच्या मागे न लागता अन्य पिके घ्यावी. ऊस पीक घ्यावयाचे असल्यास ठिबकचा वापर करावा. पाण्याच्या अति वापरामुळे शेती नापीक होत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याअभावी तुमच्या पुढच्या पिढीला स्थलांतर करु लागू नये. या भागाच्या विकासासाठी उद्योग कसे येतील यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी पदुम मंत्री महादेव जानकर म्हणाले, धोम बलकवडी अंतिम टप्प्यातील कालव्याच्या कामासाठी निधी उपलब्ध आहे. शासनाने या भागातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. छोट्या तलावातील गाळ काढून या तलावांमध्ये मस्त्य व्यवसाय करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी दूधाचे दर वाढविले. शासन हे शेतकर्‍यांच्या पाठीशी असून शेतकर्‍यांची मुले उद्योगपती व्हावी अशी शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शाखा अभियंता धनंजय घोगरे, सुरेंद्र पवार, सुनील साठे, प्रकाश पिसाळ, व्ही. एल. माने, तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.