Breaking News

महापुरुषांच्या समाजकार्याची ओळख युवकांना होणे गरजेची : अशोक सोनवणे

संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, भिंगार व रयत प्रतिष्ठानच्या वतीने
सामाजिक कार्यकर्त्यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्काराने गौरव

अहमदनगर, दि. 23 -  महापुरुषांच्या समाजकार्याची ओळख युवकांना होणे गरजेची आहे. जो महापुरुषांचा इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून, समाजकार्यात सक्रीय सहभागाद्वारे परिवर्तन करण्याचे आवाहन बहुजन चळवळीचे नेते अशोक सोनवणे यांनी केले.
संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, भिंगार व रयत प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे संजय सपकाळ, नगरसेविका शुभांगी साठे, वृक्षमित्र मांगीलाल भंडारी, शाहीर कान्हू सुंबे, जय युवा अ‍ॅकॅडमीचे अ‍ॅड.महेश शिंदे, मंजूश्री रॉय, संगीता घोडके, रहिणी धीवर, रावसाहेब मगर, दिनेश शिंदे, संयोजक संतोष धीवर, पोपट बनकर, सागर चाबुकस्वार, स्वाती बनकर, जयश्री शिंदे आदि उपस्थित होते.
भिंगार टेकडी येथे घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत तुलसीला पाणी टाकून करण्यात आले. प्रास्ताविकात संतोष धीवर यांनी वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्थांच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेवून, युवकांसाठी व्यासपिठ निर्माण करण्याच्या उद्देशाने संस्थेचे कार्य चालू असल्याचे स्पष्ट केले. संजय सपकाळ यांनी संस्थेचे कार्य कृतीशील असून, समाज परिवर्तन व विविध समस्या सोडविण्यासाठी सदर संस्था प्रयत्नशील असल्याचे मनोगत व्यक्त केले.यावेळी शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा.दादासाहेब करंजुले, समाज उन्नतीसाठी सातत्याने परिश्रम घेवून कार्य करणारे कृतीशील शिक्षक सिकंदर शेख, मानवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 76 मुलांचे संगोपन करणारे प्रा.सुनिल मतकर, बहुजन चळवळीसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करुन, युवकांमध्ये जागृतीचे काम करणारे मोहनदादा ठोंबे, धम्म परिषद, बौध्द उपासना विविध जयंती उत्सवात सामाजिक उपक्रम राबविणारे मेजर अनिल ओहोळ, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे निमगाव वाघाचे सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे, महिलांच्या कौटुंबीक समस्या सोडविणार्या रजनीताई ताठे, बचतगट चळवळ व कॅन्सर जागृती अभियानात योगदान देणार्या विद्या तन्वर, आदर्शमाता सिंधू गोरे, प्रा.दत्तू घाणे, अपंगांसाठी कार्य करणारे शारदा पुरी आदिंना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
मोहन ठोंबे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, सक्षम बनल्या आहे. महिलांमध्ये क्रांती घडविण्याचे कार्य फुले दांम्पत्यांनी केले. त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्येकाने ठेवण्याचे त्यांनी सांगितले. कृतीशील शिक्षक सिकंदर शेख यांनी समाजामध्ये सामाजिक कार्याची दखल सामाजीक संस्था घेतात ही आनंदाची बाब आहे. पुरस्काराने नवचैतन्य निर्माण होते व आणखी कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील 70 यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र बक्षिस स्वरुपात देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भिंगार परिसरातील नागरिक, महिला व युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रबोधनात्मक सूत्रसंचालन अ‍ॅड.महेश शिंदे यांनी केले. आभार संतोष धीवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम पाचारणे, रमेश गाडगे, विजय कानडे, संदिप गजभीव, प्रमोद साळवे, नवनाथ आंग्रे, कैलास गायकवाड, अमित काळे, अक्षय मगर आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, अ‍ॅड.भानुदास होले आदिंनी मार्गदर्शन केले.