डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे थाटात उदघाटन...
चिकित्सक जीवनपद्धतीचा अंगीकार करावाः शिवानंद टाकसाळे
बुलडाणा, दि. 09 - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात सामाजिक समतेचे तत्व अंगिकारले होते. त्यानुसार त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्या आयुष्याचा सर म्हणजे सामाजिक समतेतून समाजाचा विकास होय. अशा विज्ञानवादी आणि चिकित्सक जीवनपद्धतीचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आज केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त एम. जी वाठ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरात, भीमराव मुदगल, शाहीर डि. आर.इंगळे, श्री. महाले, शिवाजीराव नवघरे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, बाबासाहेबांचे विचार सूर्यप्रकाशासारखे प्रकाशमय आहेत. त्यांनी स्वतःला मंत्री किंवा नोकरीमध्ये गुंतवून न ठेवता अखंड मानव जातीच्या विकासासाठी त्यांनी कार्य केले. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अशाप्रकारे उपेक्षित समाजाच्या कल्याणाचे कार्य केल्या जात आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी भीमराव मुदगल, डि आर इंगळे, श्री. शिवाजीराव नवघरे, मनोज मेरात यांनी यावेळी प्रबोधन केले. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त एम. जी वाठ यांनी केले. त्यांनी सामाजिक समता सप्ताहाचे आयोजनामागील उद्देश विशद केला. संचालन समन्वयक विकास बाहेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा प्रवीण गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक गजानन धोटे, एस.एस. उबरहंडे, पी. एम धर्माधिकारी, बी.डी वानखडे, ए.एस इंगळे, ए. आर देशमुख, के. आर पडघन, कविता गावंडे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी, महात्मा फुले समाज कार्य महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, प्राचार्य आणि अध्यापक वर्ग, विद्यार्थी, बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी , नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
