Breaking News

संरक्षण कायदा मंजूरीचा फटाके फोडून पत्रकारांकडून जल्लोष..


हा तर पत्रकारांच्या एकजुटीचा विजयः राजेंद्र काळे

बुलडाणा, दि. 09 - पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार व प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत मंजूर केले. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत जिल्हा पत्रकार संघाकडून फटाके फोडून करण्यात आले असून, विधीमंडळात पारित झालेला हा संरक्षण कायदा म्हणजे पत्रकारांच्या एकजुटीचा व सतत 15 वर्ष दिलेल्या लढ्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अमरावती विभागीय सचिव राजेंद्र काळे यांनी केले. तर सोमनाथ सावळे यांनी हा सर्व 16 पत्रकार संघटनांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले.  
गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार व प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण मिळावे यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची मागणी संपूर्ण राज्यातून पत्रकारांच्या विविध संघटनांकडून होत होती. यासाठी पत्रकार संरक्षण समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख व किरण नाईक यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करुन पत्रकारांच्या हिताच्या मागण्यांसाठी लढा सुरुच ठेवला होता. याचेच फलित म्हणून काल 7 एप्रिल रोजी पत्रकारांवरील हल्ल्याबाबत सकारात्मक विचार करीत विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार हल्ला विरोधी विधेयक सादर करुन त्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या स्वागताकरीता जिल्हा पत्रकार संघ व विविध पत्रकार संघटणांचे प्रतिनिधींनी पत्रकार भवन येथे फटाके फोडून आनंद साजरा केला. यानंतर पत्रकारांनी एक बैठक घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अभिनंदनचा ठराव संमत करुन शासनाचे आभार मानले. यावेळी अरुण जैन, नितीन सिरसाठ, अजय बिलारी, भानुदास लकडे, रणजीतसिंह राजपूत, लक्ष्मीकांत बगाडे, हरिभाऊ उंबरकर, चंद्रकांत बर्दे, अ‍ॅड. सतिशचंद्र रोठे, गणेश निकम, सुधिर देशमुख, काशिम शेख, शौकत शहा, साबीरभाई, पवन चवरे, संदिप वंत्रोले, संजय काळे, वैभव मोहिते, निलेश राऊत, पवन सोनारे, आसिम बेग, वसीम शेख आदींची उपस्थिती होती. शेवटी पत्रकार युवराज वाघ यांचे दिवंगत वडील स्व.तेजराव वाघ यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.