Breaking News

तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च

औरंगाबाद, दि. 24 - सरकारने तूर खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका 75 वर्षीय शेतकर्‍याला तूर खरेदी केंद्रावर चक्कर आली. खाली पडल्यामुळे ते जखमी झाले आहेत आणि त्यांच्याकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत. सोनवाडी येथील शेतकरी रंगनाथ आल्हाट मागील आठ दिवसांपासून तूर विक्रीसाठी पैठण येथील केंद्रावर बसून होते. त्यांना उन्हाचा चटका बसून चक्कर आली. त्यामुळे त्यांचा पाय कंबर आणि मांडी यांच्यामध्ये मोडला आहे. त्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे.
रंगनाथ आल्हाट यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 50 हजार रूपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र तूर विकली तरीही 28 हजार रुपयेच मिळतील, त्यामुळे उपचारासाठी बाकीचे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. बारदान्याअभावी आधीपासूनच चर्चेत असलेली तूर खरेदी सरकारने अखेर बंद केली. शेतकर्‍यांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तूर खरेदी केंद्रांवर विकण्यासाठी आणलेली तूर परत नेण्यासाठीही अनेक शेतकर्‍यांकडे वाहतूक खर्चही द्यायला पैसे नाहीत.
नाफेडने तूर खरेदी बंद केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्रांबाहेर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर रांगा पाहायला मिळाल्या. लातूर, अकोला, सोलापूर, हिंगोलीसह जवळपास प्रत्येक तूर उत्पादक जिल्ह्यात असंच चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी सगळी कामं सोडून खरेदी केंद्राबाहेर तुरीची राखण करत आहे.