Breaking News

छत्तीसगडमध्ये 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, सीआरपीएफचे 25 जवान शहीद

रांची, दि. 25 - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले आहे, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात सीआरपीएफच्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या बटालियनमध्ये 90 जवान होते. यात जखमी झालेल्या जवानांना रायपूरच्या रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सुकमातील चिंतागुफामध्ये रस्ते बांधणीचं काम सुरु होतं. तेथील कामगारांना साहित्य पोहोचवण्यासाठी जवान निघाले होते. दुपारी जेवण करत असताना जवानांवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारही पळवली आहेत. जवानांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवादी नेहमीच बॉम्बहल्ला करतात, मात्र आज गोळीबार करत सीआरपीएफ जवानांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर दिल्लीत केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांनी हल्ल्यानंतर उच्चपदस्थ अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली आहे. केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर रायपूरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.