Breaking News

पांगरमल बनावट दारुकांडातील फरार आरोपीचा अपघाती मृत्यू

अहमदनगर, दि. 22 - पांगरमल दारुकांडातील फरार आरोपी राजेंद्र घुगे यांचं अपघाती निधन झालं आहे. मंगळवारी रात्री अहमदनगर-कल्याण मार्गावर ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला. मात्र हा अपघात आहे की घातपात, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. बनावट दारु तयार करणं आणि ती पुरवण्यात राजेंद्र घुगेचा महत्वाचा सहभाग होता, असं बोललं जातं. बनावट दारु तयार करणार्‍या याकूबला घुगे रिकाम्या बॉटल, झाकन आणि अल्कोहोलचा पुरवठा करत होता, असा आरोप आहे. बनावट दारुमुळे अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. यापैकी 9 जण पांगरमलचे रहिवाशी आहेत.
निवडणूक प्रचाराच्या पार्टीदरम्यान अतिमद्यपानाने आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. बनावट दारु प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे.  शिवसेना उमेदवारानं दिलेल्या पार्टीमध्ये दारु प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. याप्रकरणी चौकशीचे धागेदोरे थेट अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचले आहेत. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं होतं.