Breaking News

विद्यार्थ्यांना सुविधा देणे आपले कर्तव्य : डॉ. अनिल काकोडकर

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : विज्ञानाच्या साह्याने नवनिर्मिती हाच प्रगतीचा आणि यशाचा मार्ग आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा देणे आपले कर्तव्य आहे. सेंटरच्या माध्यमातून निश्‍चितच ज्ञानयुगाच्या संधी उपलब्ध होतील, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
सातारा तालुक्यातील वर्ये येथे महामार्गालगत शासन आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीने उभारलेल्या ’रयत सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’चे भूमिपूजन डॉ. काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सहसचिव प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उत्तमराव आवारी, प्राचार्य शहाजी डोंगरे, डॉ. सावंत, तसेच राजीव गांधी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे अरुण सप्रे, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक कृष्णास्वामी सुब्रह्मण्यम, नरेंद्र देशमुख, ए. एस. मानेकर, नेहरु सेंटरचे शिवप्रसाद खेनेडे, एस. पी. पाठक आणि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. काकोडकर यांनी विज्ञान शिक्षण सध्याची तंत्रज्ञानाची गरत याबाबत माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेच्या विज्ञान विषयक कार्याचा गौरव करुन ते म्हणाले, ज्ञान युगाकडे वाटचाल करताना तरुण मंडळीची सक्षमता वाढविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग झाले पाहिजे. त्यांचे आकलन पूर्ण झाले की आपण नव्या कल्पना पुढे आणू शकतो. अशा प्रकारची त्यांची क्षमता वाढावी, यासाठीच या सेंटरची उभारणी आपण करत आहोत. शिक्षण आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञानाचेही दर्जेदार आणि सहज शिक्षण उपलब्ध करुन दिले पाहिजे.
रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील म्हणाले देशाच्या आर्थिक क्रांती व सबलीकरणासाठी प्रत्येकाच्या मनात काहीतरी नवीन करण्याची उर्मी असली पाहिजे. या सेंटरच्या माध्यमातून जास्तीजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचून नावीन्यतेकडे वाटचाल होईल.  सप्रे, मानेकर, शिवप्रसाद खेनेडे, नरेंद्र देशमुख, एस. पी. पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिव प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी आभार मानले.