Breaking News

आबईचीवाडी अपहरणप्रकरणी घालवाडमधील दोघांना अटक

कराड, दि. 17 (प्रतिनिधी) : सव्वासात लाखांच्या खंडणीसाठी आबईचीवाडी येथील संजय बळवंत सुर्वे यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील ऋषिकेश श्रीकांत भंडारी (वय 19) व स्वागत दत्तात्रय जाधव (23) यांना पोलिसांनी अटक केली. दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. अपहरण झालेले सुर्वे यांनी दोघांकडून नोकरीस लावतो म्हणून सव्वासात लाख रुपये घेतले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. ते पैसे वसूल करण्यासाठी त्यांनी सुर्वे याला नेले होते. मात्र त्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. सुर्वे याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी काही लोक पोलीस ठाण्यात आले होते. 
संजय सुर्वे यांच्या घरी संबंधित दोघे 8 मार्च रोजी आले होते. सुर्वे दोघांना सोडून येतो, असे पत्नीस सांगून दुचाकीवरून गेले. मात्र, परत आले नाहीत. त्यानंतर सुर्वे यांची बहीण व पत्नीला सुर्वेच्या मोबाईलवरून कॉल करून पैशाची मागणी करण्यात आली. म्हणून पत्नीने सुर्वें याच्या अपहरणाची फिर्याद दिली होती. त्यानुसार त्या दोघांना अटक झाली आहे. सुर्वे याने दोघांसह काही लोकांकडून सैन्यात नोकरीस लावतो, असे सांगून पैसे घेतल्याची माहिती तापासात समोर येवू लागली आहे.
सुर्वे याच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुर्वे याने त्यांच्यासह सात जणांना सैन्यात नोकरीस लावतो म्हणून फसवले आहे. नोकरीच्या आमिषाने संबंधित 7 लोकांनी सुमारे 20 लाख रुपये सुर्वे याला दिले आहेत, असेही त्या युवकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्याची पोलीस खात्री करत आहेत.