Breaking News

पुरंदर तालुक्यातील गुरव समाज बांधव बहुसंख्येने मोर्चात सहभागी होणार - जयदीप बारभाई

पुणे, दि. 23 - महाराष्ट्रातील बहुजन वर्गातील गुरव समाज बांधव शासनाच्या सोई-सुविधा आणि सवलतींपासून वंचित असून. शासनदरबारी न्याय्य आणि उचित मागण्यांसाठी येत्या 30 मार्चला मुंबई येथील आझाद मैदानावर होणार्‍या धरणे आंदोलनात पुरंदर मधील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा जेजुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असलेल्या गुरव समाज बांधवांचे प्रश्‍न व प्राथमिक मागण्यांच्या अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या 30 मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून. मोर्चात सहभागी होण्यासाठी पुरंदर मधील गुरव समाज बांधवांच्या प्रमुख प्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन जेजुरी येथे करण्यात आले होते.यावेळी जेजुरी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप बारभाई, दिवाकर बारभाई, माधव बारभाई, दिलीप आगलावे, भाग्येश बारभाई, विलास बारभाई, प्रीतम बारभाई आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय मसुरकर कार्यकारी अध्यक्ष वसंत बंदावणे यांच्या मार्गदर्शनाखाली मागण्यांचे निवेदन तयार करण्यात आले आहे.गुरव समाज बांधवांकडे असलेल्या देवस्थान इनाम वर्ग -3 चे वतन खालसा करणे जमिनींचा फेर सर्व्हे करणे, बेकायदेशीर हस्तांतरण केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत करणे .समाजबांधवांची नावे कब्जेदार सदरी लावणे देवस्थान जमिनींना लावलेले बेकायदेशीर कुळ काढून टाकणे, महाराष्ट्रातील मंदिर ट्रष्टमध्ये समाज बांधवांना 50 टक्के विश्‍वस्त पदाधिकारी म्हणून नियुक्ती करणे, समाज बांधवांचा देवस्थान पूजेचा धार्मिक विधींचा व उत्पन्नाचा वंश परंपरागत हक्क कायम ठेवणे, शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिष्यवृत्ती देणे, समाजातील जेष्ठ पुजारी-सेवेकरी यांना शासनामार्फत निवृत्ती वेतन व अनुदान देणे मंदिर अधिग्रहण कायदा रद्द करणे, शासनाने मंदिरे स्वयंपूर्ण करून त्यावरील होत असलेली राजकीय अतिक्रमणे थांबवणे, शेतीविषयक कर्जपुरवठा सवलतीमध्ये उपलब्ध करून देणे कोकण भागात समाजाला ओबीसी दाखले मिळावेत, ओबीसींचे निधी वाटप जातीनिहाय व्हावे, गुरव समाजाला अल्पसंख्यांकांचा दर्जा व अधिकार मिळावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जेजुरी येथील जयदीप बारभाई यांचेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून याबाबत गुढीपाडव्याचे दिवशी (दि.28 )पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जेजुरी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप बारभाई यांच्या मार्फत सदरील निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, समाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पाठविण्यात येणार असल्याचे जयदीप बारभाई यांनी सांगितले.