Breaking News

एमआयडीसी ठाणे स्मार्ट पोलिस ठाणे, एसपींनी केले उदघाटन

लातूर (प्रतिनिधी), दि. 03 - पोलिस यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी स्मार्ट पोलिस ठाण्याची योजना समोर आली आहे. राज्यातली सगळी पोलिस ठाणी यासाठी प्रयत्नशील आहेत. आपापल्या परीने आपले ठाणे स्मार्ट कसे होईल यासाठी संबंधित ठाण्यातली कर्तबगार मंडळी कामाला लागली आहे. या प्रयत्नात लातूर जिल्ह्यात सर्वात आधी स्मार्ट पोलिस ठाण्याचा किताब मिळवण्यात लातूरचे एमआयडीसी ठाणे अग्रेसर ठरले आहे. रेणापूरचं ठाणं दुसरं ठरलं आहे. एमआयडीसी ठाण्याचे कर्तबगार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी ही किमया घडवून आणली आहे. या स्मार्ट पोलिस ठाण्याचे उदघाटन आज जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी केले. 
या ठाण्याच्या इमारतीवर दुसरा मजला बांधण्यात आला आहे. या मजल्यावर एक मोठा हॉल आणि एक खोली बांधण्यात आहे. यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, आणि बाहेरुन आलेल्या किंवा रात्री उशिरापर्यंत काम करणार्या पोलिस कर्मचार्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय या ठाण्याने तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पहिला कॅमेरा ठाण्यासमोर, दुसरा सारथी चौकात आणि तिसरा पाच नंबर चौकात बसवण्यात आला आहे. लवकरच रेणापूर नाक्यावरही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.
स्मार्ट पोलिस ठाण्यासाठी जिल्ह्यातून दोन ठाण्यांची निवड करावी असे आदेश होते. या ठाण्यातल्या मूलभूत सुविधा स्मार्ट असाव्यात, कर्मचारी-अधिकारी स्मार्ट असावेत, जनतेला स्मार्ट सेवा मिळावी अशी संकल्पना होती. एमआयडीसी ठाण्याच्या माध्यमातून जवळपास या सेवा आम्ही पुरवल्या आहेत. रेणापूर ठाण्याच्या कामासाठी थोडा वेळ लागणार आहे. अबालवृद्धांना चांगल्या सेवा मिळतील अशी संकल्पना आहे. एमआयडीसी ठाण्याने सोळा ठिकाणी कॅमेरे लावण्याचे ठरवले आहे. चार्लीच्या गाड्यांना जीपीएस सेवा सुरु करणार आहोत, नागरिकांनीही या कामी सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केली.